देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला 11 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 17 सामने आयोजित केले गेले होते. एलिट बी गटात दिल्ली व पंजाब यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार नितिश राणाने सर्वांची मने जिंकत शानदार शतक झळकावले. या शतकासह त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात येण्यासाठी दावेदारी ठोकली आहे.
स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात मनिपूरवर दणदणीत विजय मिळवलेल्या दिल्लीने या सामन्यातही विजयाच्या इराद्याने पाऊल ठेवले. या दुसऱ्या सामन्यात दिल्लीची जबाबदारी कर्णधार नितेश राणाने आपल्या खांद्यावर घेतली. पहिले दोन गडी केवळ दहा धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार राणा व युवा यश धूल यांनी तब्बल 173 धावांची भागीदारी केली. राणाने 61 चेंडूंमध्ये 9 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने 107 धावांची शानदार खेळी केली. धूलने त्याला तोलामोलाची साथ देत 45 चेंडूवर नाबाद 66 धावा केल्या. या दोघांच्या खेळाच्या जोरावर दिल्लीने 4 बाद 191 धावा केल्या.
ICYMI: An exceptional captain's knock from @NitishRana_27 💯
Rescued his side from trouble and then went on to score a special century 🙌 #DELvPUN | #SyedMushtaqAliT20
Watch that breathtaking innings here 🎥🔽https://t.co/jw7xhyIsYq
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 12, 2022
या धावांचा पाठलाग करताना पंजाबने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अभिषेक शर्माने 33, अनमोलप्रीतने 64 तर मनदीपने 44 धावांचे योगदान दिले. अखेरीस ते विजयी लक्षापासून 12 धावांनी मागे राहिले.
यावर्षी दिल्ली संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेल्या नितीश राणाला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची मागील वर्षी संधी मिळली होती. श्रीलंका दौऱ्यावर त्याने दोन टी20 व एक वनडे सामना खेळला होता. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये देखील चांगली कामगिरी केली. परंतु त्याच्यासाठी भारतीय संघाचे दार खोलले गेले नाही. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान न मिळाल्याने त्याने सोशल मीडिया वरून खंत व्यक्त केली होती.