भारतीय बॅडमिंटनपटुंची मागील एक- दीड वर्षातील कामगिरी खूप जबरदस्त राहिली आहे. त्याला अपवाद राहिली ती फक्त जपान ओपन सुपर सिरीज. या सिरीजमध्ये एकही भारतीय बॅडमिंटनपटू सेमी फायनलपर्यंत पोहचू शकला नाही.
कोरिया ओपन जिंकून जपान ओपनमध्ये विजेती होण्यासाठी उतरलेली पीव्ही सिंधू पहिल्याच फेरीत गारद झाली. किदांबी श्रीकांत, साई प्रणीत, साईना नेहवाल यांची देखील तशीच परिस्थिती राहिली होती. जपान ओपननंतर आजपासून डेन्मार्क ओपन सुरु होत आहे. डेन्मार्क ओपन १७ -२२ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
या स्पर्धेत भारतीय खेळाडू किती आव्हान निर्माण करू शकतात याचा घेतलेला आढावा.
पीव्ही सिंधू-
या स्पर्धेत देखील सर्वांची नजर पीव्ही सिंधूवर आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत होऊन देखील सिंधूने या वर्षी ३ विजेतेपदे पटकावली आहेत. या स्पर्धेची सुरुवात सिंधू जागतिक मानांकन यादीत १०व्या क्रमांकावर असणाऱ्या चेन युफेई हिच्या विरुद्धच्या सामन्यांपासून करणार आहे.
पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर उपउपांत्यपूर्व फेरीचा तिचा सामना ७वे मानांकन प्राप्त खेळाडू बिंगजिओ हिच्यासोबत होण्याची शक्यता आहे. या चायनीज खेळाडू विरुद्ध सिंधूला नेहमीच खूप कष्ट करून सामने जिंकावे लागले आहेत. त्याच बरोबर या खेळाडू विरुद्धचा इतिहास पहिला तर बिंगजिओ ५-४ अशी पुढे आहे.
सेमीफायनलच्या सामन्यात तिची गाठ ४थ्या मानांकीत अकाने यामागूची किंवा ऑलंपिक विजेती कॅरोलिना मरीन. मरीन या मोसमात लयीत नव्हती, परंतु जपान ओपन जिंकून लयीत परातल्याचे संकेत दिले आहेत.
साईना नेहवाल-
साईनासाठी स्पर्धेतील आव्हाने खूप मोठी आहेत. माजी विजेती खेळाडू साईनाची पहिल्याच सामन्यात गाठ कॅरोलिना मरीनशी आहे. मरीन सध्या लयीत आहे. जपान ओपेनमध्ये दुसऱ्या फेरीत मरीनने साईना हरवून भारतीयांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आणले होते.
किदांबी श्रीकांत-
इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजेता खेळाडू श्रीकांत हा भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूमधील सर्वात तगडे आव्हान आहे. या स्पर्धेचा सुरुवातीचा सामना किदांबी त्या खेळाडूंबरोबर खेळणार आहे जो खेळाडू पात्रता फेरीतुन मुख्य स्पर्धेत प्रवेश करेल. दुसऱ्या सामन्यात त्याच्या समोर दुसरा मानांकित डेन्मार्कचा विक्टर अक्सेलसन याचे आव्हान असणार आहे.