---Advertisement---

ओडिशाला चांगले खेळूनही विजय नाही मिळाला, मोहन बागानने सामना गोल शून्य बरोबरीत रोखला

ATK Mohun Bagan FC vs Odisha FC
---Advertisement---

यजमान ओडिशा एफसीने हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) च्या आजच्या सामन्यात एटीके मोहन बागानपेक्षादर्जेदार खेळ केला. पण, नशिबाने पाठ फिरवल्याने ओडिशाला गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. हिरो आयएसएलमध्ये उभय संघांत आजच्या लढतीपूर्वी चार सामने झाले होते आणि त्यात मोहन बागानने दोन विजय मिळवले होते. दोन सामने अनिर्णित राहिले होते आणि आज ओडिशा ही मालिका खंडित करतील असे वाटले. पण, अव्वल दर्जाचा खेळ करूनही ओडिशाला ड्रॉवर समाधान मानावे लागले. ८८व्या मिनिटाला ओडिशाच्या ओसामा मलिकने गोलपोस्टच्या अगदी समोरून वेगवान हेडर मारलेला, परंतु मोहन बागानच्या गोलरक्षक विशाल कैथने अप्रतिम पद्धतीने तो रोखला. पण, या निकालानंतरही ओडिशा एफसी चौथ्या स्थानावर सरकले.

मोहन बागानविरुद्ध हिरो आयएसएलमध्ये पहिला विजय मिळवण्याच्या निर्धाराने यजमान ओडिशा एफसी मैदानावर उतरले. पहिल्या ३० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांचा खेळ मात्र तोडीसतोड झाला. मोहन बागानने १ ऑन टार्गेट प्रयत्न ठेवला, पण यजमानांचे दोन्ही प्रयत्न ऑफ टार्गेट राहिले. दोन्ही संघ आलटून पालटून एकमेकांवर आक्रमण करताना दिसले. मोहन बागानने आक्रमणात तुलनेने कमी प्रभाव पाडला असला तरी त्यांचा बचाव आज मजबूत दिसला. ३३व्या मिनिटानंतर पुढील ६० सेकंदात ओडिशाकडून गोल करण्याचे दोन प्रयत्न झाले, केवळ चेंडूला अंतिम दिशा देण्यात ते थोडक्यात हुकले. ४०व्या मिनिटाला जेरीच्या पासवर बचावपटू ओसामा मलिकने संधी गमावली. ४२ व्या मिनिटाला एटीके मोहन बागानचा गोल ओडिशाचा गोलरक्षक अमरिंदर सिंगने रोखला.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी समसमान संधी निर्माण करताना एकमेकांना आव्हान दिले. कार्लोस रॉड्रीगेजला मिळालेली संधी ही ओडिशा एफसीला आघाडी मिळवून देणारी ठरली असती.

मध्यंतरानंतर लिस्टन कोलासोने मोहन बागानला आक्रमक सुरूवात करून दिली आणि दुसऱ्याच मिनिटाला गोलचा प्रयत्न केला. पण, त्यानंतर ओडिशा एफसीच्या आक्रमणाची धार अधिक तीव्र झाली. ५२व्या मिनिटाला मोहन बागानच्या बचावपटूंनी त्यांच्याच पेनल्टी क्षेत्रात चूक केली आणि त्यावर रायनिएर फर्नांडेसने चेंडूवर ताबा मिळवर ऑन टार्गेट प्रयत्न केला. पण, मोहन बागानचा गोलरक्षक विशाल कैथने तो रोखला, परंतु तो सहकाऱ्यांवर नाराज दिसला. ओडिशा वरचढ झालेले दिसले आणि पुढील १५ मिनिटांत त्यांच्याकडून सातत्याने गोल करण्याचे प्रयत्न झाले.

७१व्या मिनिटाला ओडिशाच्या खेळाडूंनी चेंडू गोलजाळीत पाठवला. फर्नांडेसच्या हेडरवरून आलेला चेंडू डिएगो मॉरिसिओने गोलजाळीत पाठवला, परंतु रेफरीने ऑफ साईडचा फ्लॅग उचलला. मॉरिसिओसह अनेकांनी रेफरीच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. ओडिशाचा कार्लोस डेलगाडो प्रचंड नाराज झाला आणि मुख्य प्रशिक्षक जोसेफ गोम्बाऊ यांनीही नाराजी व्यक्त केली. ओडिशाच्या खेळाडूंनी ७५ मिनिटांच्या खेळात १२ फाऊल केले, प्रत्युत्तरात मोहन बागानकडून दोन फाऊल झाले. ७५व्या मिनिटाला दिमित्रि पेट्राटोसचा ऑन टार्गेट प्रयत्न ओडिशाच्या गोलरक्षकाने रोखला. मोहन बागानच्या गोलरक्षकानेही सुरेख कामगिरी केली. ही लढत गोलशून्य बरोबरीत सुटली.

निकाल : ओडिशा एफसी ० बरोबरी वि. एटीके मोहन बागान ०.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पदार्पणाच्या दिवशीच ‘या’ खेळाडूच्या आईचे झाले होते निधन; म्हणाला, ‘तिला मला खेळताना पाहायचं होतं’
अरे हा अमेरिकेचा की भारताचा संघ? यूएसएच्या अंडर 19 टीमवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---