कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध भारत संघात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (२८ जुलै) खेळला गेला. श्रीलंकेने हा सामना आपल्या नावे करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी, पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडिक्कलचे भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने तोंडभरून कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर त्याने या खेळाडूला शिखर धवनचा उत्तराधिकारी म्हणून देखील घोषित केले.
पहिल्या सामन्यात पडिक्कलची चमकदार कामगिरी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकसाठी व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी केलेल्या दमदार कामगिरीचे बक्षीस म्हणून पडिक्कलला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवडले गेले होते. वनडे मालिकेत त्याला संधी मिळाली नव्हती. टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी अष्टपैलू कृणाल पंड्या कोरोनाबाधित आढळल्याने व त्याच्या संपर्कात आठ खेळाडूंना क्वारंटाईन करावे लागल्याने पडिक्कलला संधी मिळाली. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना तो २३ चेंडूमध्ये २९ धावा काढून माघारी परतला.
भारतीय दिग्गज झाला प्रभावित
देवदत्त पडिक्कल याच्या पहिल्या सामन्यातील कामगिरीमुळे भारताचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग चांगलाच खुश झाला. त्याने एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाशी बोलताना म्हटले, “मी पडिक्कलला चांगली कामगिरी करताना पाहू इच्छितो. त्याने काही शानदार खेळ्या केलेल्या आहेत. त्याच्या नावे आयपीएलमध्ये शतक देखील आहे. मला वाटते ज्यावेळी शिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडेल, त्यावेळी त्याचा उत्तराधिकारी म्हणून पडिक्कल योग्य ठरेल. या खेळाडूंना भारतीय उपखंडातील अनुभव मिळणे आवश्यक आहे. कारण, ज्यावेळी हे खेळाडू इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियामध्ये जातील त्यावेळी हा आत्मविश्वास त्यांच्यासोबत असायला हवा.”
२१ व्या शतकातील पहिला भारतीय क्रिकेटपटू
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात पदार्पण करताच पडिक्कल भारताचा ८९ वा टी२० पुरुष क्रिकेटपटू बनला. यासोबतच तो २१ व्या शतकात जन्मलेला पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरला. पडिक्कलसोबत चेतन सकारिया, ऋतुराज गायकवाड व नितीश राणा यांनीदेखील टी२० पदार्पण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘गोल्डन डक’ वर बाद होताच ‘कर्णधार’ शिखर धवनच्या नावे जमा झाला ‘हा’ नकोसा विक्रम
संयमाचे मिळाले फळ! वयाच्या तिशीत वॉरियर खेळतोय पहिला आंतरराष्ट्रीय सामना
त्याच नशीबच फुटके! ‘त्या’ घटनेनंतर सैनी जोरदार ट्रोल, चाहत्यांनी शेअर केले मजेदार मीम्स