नवी दिल्ली| आयपीएलच्या या हंगामात पदार्पण करणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा युवा फलंदाज देवदत्त पड्डीकल याने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. शनिवारी (3 ऑक्टोबर) त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपल्या आयपीएल कारकिर्दीचा चौथा सामना खेळला, ज्यामध्ये त्याने पुन्हा एकदा अर्धशतक ठोकले. हे पड्डीकलचे आयपीएलमधील तिसरे अर्धशतक होते. पहिल्या चार सामन्यात तीन अर्धशतके झळकावणारा तो लीगमधील एकमेव फलंदाज आहे. या युवा फलंदाजाचे माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगनेही कौतुक केले आहे.
पड्डीकलबरोबर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचेही युवराजने कौतुक केले आहे. विराटने राजस्थानविरुद्ध 72 धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात पड्डीकलने 63 धावांची खेळी केली. तसेच विराट आणि पड्डीकलने 99 धावांची जबरदस्त भागीदारी रचली. त्यामुळे राजस्थानने दिलेले 155 धावांचे आव्हान बेंगलोरने 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.
युवराजने पड्डीकलचे कौतुक करताना ट्विटरवर लिहिले, “ पड्डीकल चांगली फलंदाजी करत आहे, त्याच्याबरोबर आता फलंदाजी करण्याची गरज आहे. मग पाहू कोण मोठे फटके खेळतो.”याचबरोबर युवराजने गमतीशीर इमोजीदेखील शेअर केला आहे.
Form is temporary class is forever ! @imVkohli however I haven’t seen this boy out of form since last 8 years which is unbelievable actually ! Paddikal looks really good need to bat together and see who hits longer 😜
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 3, 2020
युवराजने या ट्विटमध्ये कर्णधार विराट कोहलीचे कौतुक करताना म्हटले, “फॉर्म हा तात्पुरता असतो पण दर्जा कायम राहतो. मी गेल्या 8 वर्षांत विराट कोहलीला कधीही वाईट प्रदर्शन करताना पहिले नव्हते. आज त्याची कामगिरी अविश्वसनीय होती.”
पड्डीकलने या स्पर्धेत आतापर्यंत तीन अर्धशतकांच्या साहाय्याने 174 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. महत्वाची बाब म्हणजे त्याने ज्या सामन्यात अर्धशतक ठोकले त्या तीनही सामन्यात बेंगलोरचा विजय झाला आहे.
यापूर्वी त्याने पदार्पणाच्या आयपीएल सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 56 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसर्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 1 धावांवर तो बाद झाला. या सामन्यात बेंगलोरचा 97 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला होता. त्यानंतर त्याने मुंबईविरुद्ध 54 आणि राजस्थानविरुद्ध 63 धावा केल्या.