---Advertisement---

“गेल आणि ब्राव्होची कारकीर्द सर्वांसाठी आदर्श”

On: रविवार, नोव्हेंबर 7, 2021 4:34 PM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या ३८ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ७ गडी गमावून १५७ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा कर्णधार कायरन पोलार्डने (४४ धावा) केल्या. वेस्ट इंडिजने दिलेले १५८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने २ गडी गमावून केवळ १६.२ षटकांत सहज गाठले. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचे दोन दिग्गज ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो निवृत्त झाले. डेविड वॉर्नरने या दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले आहे.

या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावणारा सलामीवीर डेविड वॉर्नरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. तो म्हणाला, “अशा कामगिरीनंतर मला खूप छान वाटत आहे. पहिल्या दोन चेंडूंमध्ये मी आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मी यशस्वी झालो. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांचे फलंदाज आक्रमक भूमिका घेणार आहेत हे आम्हाला माहीत होते. मात्र, आमच्या गोलंदाजांनी त्याचा चांगल्या प्रकारे सामना केला. ब्राव्हो आणि गेल हे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांच्या कारकीर्दने सर्वांसाठी एक आदर्श ठेवला आहे. मला ख्रिस गेल फलंदाज म्हणून खूप आवडतो.”

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर वेस्ट इंडिजने धमाकेदार सुरुवात केली. सलामीवीरांनी अवघ्या १४ चेंडूत ३० धावा केल्या. पण ही भागीदारी पॅट कमिन्सने ख्रिस गेलला (१५) बाद करून तोडली. पुढच्याच षटकात जोश हेझलवूडने निकोलस पूरन (४) आणि रोस्टन चेस (०) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अॅडम झाम्पाने एविन लुईसची (२९) विकेट घेतली. त्याचवेळी शिमरॉन हेटमायरला (२७) बाद करून हेझलवूडने पाचवा धक्का दिला. शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा ड्वेन ब्राव्हो फार काही करू शकला नाही आणि १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार पोलार्डने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३१ चेंडूत ४४ धावा केल्या.

वेस्ट इंडिजने दिलेल्या १५८ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार फिंच (९) डावाच्या चौथ्या षटकात अकील हुसेनचा बळी ठरला. पण, यानंतर डेविड वॉर्नरने मिचेल मार्शसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७५ चेंडूत १२४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, लक्ष्य गाठण्यापूर्वीच ख्रिस गेलने मार्शची (५३) विकेट घेतली. सलामीवीर डेविड वॉर्नरने ५६ चेंडूत नाबाद ८९ धावांची खेळी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---