न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. बुधवारपासून (२ जून) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३७८ धावांचा डोंगर उभारला आहे. या भल्यामोठ्या धावसंख्येत न्यूझीलंडचा पदार्पणवीर डेविन कॉन्वे याच्या २०० धावांचा समावेश आहे.
लॉर्ड्स या ऐतिहासिक मैदानावर या फलंदाजाने एकाच सामन्यात बरेचसे जुने आणि शानदार विक्रम मोडीत काढले आहेत. १५० धावांचा आकडा ओलांडल्यानंतर त्याने १००हून अधिक वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडला आहे.
शानदार शतकानंतर कॉन्वेने १५० धावांचा आकडा पार केला. दीडशतकानंतर १५६ धावांपर्यंत पोहोचताच त्याने तब्बल १२५ वर्षे जुना विक्रम मोडला. सन १८९६ मध्ये केएस रणजितसिंगजी यांनी हा विक्रम नोंदवला होता. भारतीय मूळ असलेल्या रणजितसिंगजी यांनी इंग्लंडकडून इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पण करताना सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम केला होता. त्यावेळी त्यांनी तब्बल नाबाद १५४ धावांची धुव्वादार खेळी केली होती.
कॉन्वेने केवळ रणजितसिंगजी यांनाच नव्हे तर कित्येक दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकले आहे. त्याने इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पणात सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या रणजितसिंगजी यांच्याव्यतिरिक्त डब्ल्यूजी ग्रेस, पीटर मे आणि सौरव गांगुली यांनाही पिछाडीवर टाकले आहे.
इंग्लंडमध्ये कसोटी पदार्पणात सर्वोच्च धावसंख्या-
डेविन कॉन्वे (२०० धावा विरुद्ध इंग्लंड, २०२१)
केएस रणजितसिंगजी (नाबाद १५४ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १८९६)
डब्ल्यूजी ग्रेस (१५२ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १८८०)
अखेर द्विशतक पूर्ण केल्यानंतर ऑली पोप आणि कर्णधार जो रुट यांनी मिळून कॉन्वेला धावबाद केले. त्यामुळे ३४७ चेंडूत २०० धावा करत तो बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने एक षटकार आणि २२ चौकार मारले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
आई आणि बहीण गमावलेली भारतीय क्रिकेटपटू ‘अशी’ आली दुःखातून बाहेर, स्वतः सांगितली कहानी
कसोटी चॅम्पियनशीप फायनल: जडेजा की अश्विन, कोण असेल भारतीय संघाचा विघ्नहर्ता?
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कधीही शुन्यावर बाद न झालेले दोन भारतीय क्रिकेटपटू