एमपीएल 2025 ची उत्कंठा शिगेला पोचली आहे. देशातील सर्वोत्तम टी20 लीगपैकी एक असलेल्या या लीगमध्ये अनेक दमदार खेळाडू आपला खेळ दाखवतात. त्यापैकीच एक असलेल्या धनराज शिंदे (Dhanraj Shinde) याने एमपीएल 2024 मध्ये एक ऐतिहासिक खेळी करत आपली ‘सिक्सर किंग’ ही ओळख आणखी गडद केली.
दुसऱ्या हंगामात रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स हा साखळी फेरीतील सामना 8 जून रोजी खेळला जाणार होता. मात्र, पावसामुळे सामना दुसऱ्या दिवशी खेळला गेला. दुसऱ्या दिवशी देखील पावसाने उघडीप न घेतल्याने, हा सामना फक्त पाच षटकांचा खेळण्याचा निर्णय झाला. त्यानंतर गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या पाच षटकांच्या झालेल्या या सामन्यात रत्नागिरी संघाने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 83 धावा केल्या. यामध्ये धीरज फटांगरे याने 13 चेंडूवर 28, निखिल नाईक याने 9 चेंडूत 24 व प्रीतम पाटील याने 6 चेंडूत 21 धावा केल्या. नाशिक संघासाठी हरी सावंत व अर्शिन कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
रत्नागिरी संघाची गोलंदाजी पाहता नाशिक संघासाठी विजय दूर वाटत होता. त्यात या धावांचा पाठलाग करताना नाशिक संघाला अर्शिन कुलकर्णी याच्या रूपाने पहिला मोठा धक्का 5 धावांवरच बसला. मात्र, मंदार भंडारी व धनराज शिंदे यांनी दुसऱ्या षटकात निकीत धुमाळ याच्याविरुद्ध तब्बल 34 धावा वसूल केल्या. विजय पावले याने उत्कृष्ट गोलंदाजी करत केवळ 12 धावा दिल्या. त्यामुळे नाशिक संघाला विजयासाठी अखेरच्या दोन षटकात 31 धावांची गरज होती.
डावातील चौथे षटक टाकण्यासाठी दिव्यांग हिंगणेकर याने चेंडू हातात घेतला. त्याने पहिल्या षटकात केवळ पाच धावा देत एक बळी मिळवलेला. मात्र , यावेळी काहीतरी वेगळेच घडले. धनराज याने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले. तिसरा चेंडू निर्धाव गेला. पुढील चेंडू वाईड गेल्यानंतर धनराज याने सलग तीन षटकार ठोकत सामना जिंकवला.
धनराज याने केवळ बारा चेंडूत 39 धावा केल्या. यादरम्यान त्याने सहा षटकार खेचले. तर, दुसऱ्या बाजूला मंदार भंडारी याने देखील तशीच फटकेबाजी करत 14 चेंडूंमध्ये नाबाद 35 धावा कुटल्या. यात प्रत्येकी तीन चौकार व तीन षटकारांचा समावेश होता. या दोघांच्या वादळामुळे नाशिक संघाने 84 धावा गाठण्यासाठी फक्त चार षटके घेतली. हा अद्यापही स्पर्धेतील विक्रम आहे.
एमसीए अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितल्याप्रमाणे, एमपीएल व डब्ल्यूएमपीएल या दोन्ही स्पर्धा प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत पाहता येतील. तर, JioHotstar व Star Sports 2 येथे सामन्यांचा लाईव्ह आनंद घेता येणार आहे. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 TV Channel)






