---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकूनही पाकिस्तान होतोयं ट्रोल, भारतीय दिग्गजाने घेतली त्यांच्या पंतप्रधानांची फिरकी!

On: शुक्रवार, जानेवारी 30, 2026 4:05 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२६साठी अधिक सराव व्हावा यासाठी अनेक संघ टी२० मालिका खेळण्यात व्यस्त आहेत. भारत-न्यूझीलंड यांच्यातही पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात असून शेवटचा सामना शनिवारी (३१ जानेवारी) तिरुअनंतपुरमध्ये खेळला जाणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा संघही पाकिस्तान दौऱ्यावर असून त्यांचीही तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे.

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेला हा सामना पाकिस्तानने जिंकला. त्यावर त्यांच्या पंतप्रधानांनी संघाचे अभिनंदन करणारी पोस्ट ‘एक्स’वर टाकली. त्यामध्ये त्यांनी लिहिले, “मी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याबद्दल संघ आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांचे अभिनंदन करतो. त्यांनी पाकिस्तान क्रिकेटला मजबूत स्थितीत आणले असून हा देशासाठी गर्वाचा क्षण आहे.”

त्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने म्हटले, “हा सामना द्विपक्षिय मालिकेचा असून तो ऑस्ट्रेलिया बी संघाविरुद्ध होता. यामध्ये त्यांचे अनेक महत्वाचे खेळाडू खेळले नाहीत. तसेच टी२०मध्ये विजयासाठी १७० धावसंख्या असलेल्या विजयाला जबरदस्त म्हणणे योग्य नाही.” त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही त्याची मजा घेतली आहे.

या सामन्यात पाकिस्ताने कर्णधारपद सलमान आगा सांभाळत असून त्याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये सईम आयुबने ४० धाव आणि सलमानने ३९ धावा केल्याने पाकिस्तानने २० षटकात ८ विकेट्स गमावत १६८ धावसंख्या केली.

लक्ष्याचा पाठलाग करणारा ऑस्ट्रेलिया या सामन्यात ट्रेविस हेडच्या नेतृत्वाखाली खेळला. त्यांनी २० षटकात ८ विकेट्स गमावत १४६ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना २२ धावांनी जिंकला.

या सामन्यातून एक गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे बाबर आझम जरी संघात परतला असला तरी त्याचा फलंदाजीचा तिसरा क्रम मात्र त्याला मिळाला नाही. त्यावर सलमानने फलंदाजी केल्याने बाबर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. तसेच ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी अनेक महत्वाच्या खेळाडूंना ब्रेक दिला आहे.

या मालिकेतील उर्वरित दोन्ही सामने लाहोरमध्येच खेळले जाणार आहेत. दुसरा सामना ३१ जानेवारीला आणि तिसरा सामना १ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघ टी२० विश्वचषकासाठी रवाना होणार असून पाकिस्तानबाबत मात्र शंका आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---