भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी लोकांची मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो नेहमी इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने घेतलेले निर्णय इतरांना आश्चर्यचकीत करणारे असतात. पाठीमागे भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी धोनीबद्दल खुलासा केला होता.
गावस्करांनी त्यावेळी सांगितले की, देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान धोनी (MS Dhoni) बिझनेस क्लासमध्ये भारतीय संघाबरोबर बसत नसे. म्हणजे असे नाही की धोनीला आपल्या संघसहकाऱ्यांबरोबर बसण्यास काहीच अडचण होती. खरं तर यामध्ये न बसण्याचे दुसरेच कारण होते.
धोनी भारतीय संघाचा कर्णधार असूनही त्याला इकॉनॉमी क्लासमध्ये टी.व्ही. क्रूबरोबर (TV Crew) बसायला आवडते. खरं तर भारतीय संघात अशी व्यवस्था आहे की, चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच बिझनेस क्लासमधून प्रवास करण्यासाठी सीट उपलब्ध असते. धोनीने चांगली कामगिरी केली आहे. तरीही तो बिझनेस क्लासमधून प्रवास करत नाही. तर तो टी.व्ही. क्रूबरोबर बसतो.
गावसकर याबद्दल बोलताना म्हणाले होते की, “देशांतर्गत क्रिकेटमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दोन्हीही संघ एकाच चार्टर्ड विमानाने प्रवास करतात. यामध्ये टी.व्ही. क्रूचे सदस्य असतात. अशामध्ये बिझनेस क्लासमध्ये (Business Class) मर्यादित सीट्स उपलब्ध असतात. ज्यामध्ये कर्णधार, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक बसतात.”
“परंतु धोनी कर्णधार असूनही तो केव्हातरीच बिझनेस क्लासमधून प्रवास करत होता. अधिक वेळा तर तो इकॉनॉमी क्लासमध्ये (Economy Class) टी.व्ही. कव्हरेज करणाऱ्या लोकांबरोबर आणि कॅमेरामन किंवा साऊंड इंजिनियर यांच्याबरोबर बसत होता,” असेही गावसकर यावेळी म्हणाले होते.





