6 आॅक्टोबरला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उत्तराखंडचा कर्णवीर कौशलने सिक्कीम विरुद्ध खेळताना द्विशतक केले. त्यामुळे तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे
याबरोबरच त्याने अजिंक्य रहाणेचा विजय हजारे ट्रॉफीमधील187 धावांचा सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा विक्रम मोडला आहे. रहाणेने मुंबईकडून 2007 मध्ये महाराष्ट्राच्या विरुद्ध पुण्यात खेळताना 187 धावांची खेळी केली होती.
कर्णवीर कौशलने हा विक्रम मोडला असला तरी तो भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचा मोठा चाहता आहे. त्याला धोनीची फलंदाजीची शैली आवडते. तसेच त्याला धोनीप्रमाणेच फलंदाजी करण्याची ईच्छा आहे.
याबद्दल कर्णवीर कौशल टाइम्स आॅफ इंडियाशी बोलताना म्हणाला, ‘मी धोनी आवडतो. मला त्याच्यासारखे खेळायला नेहेमी आवडते. मला त्याच्यासारखे जगातील सर्वोत्तम खेळाडू बनायचे आहे. त्याची खेळण्याची पद्धत आणि दबाव हाताळण्याचे कौशल्य हे सर्व मला आवडते.’
‘भारतीय क्रिकेट हे खूप नशीबवान आहे. की त्यांना धोनीसारखा क्रिकेटपटू मिळाला. मला एक दिवस त्याला भेटायला आवडेल आणि मला प्रेरणा दिल्याबद्दल आभार मानायचे आहेत.’
त्याचबरोबर त्याच्या विक्रमाबद्दल आणि अजिंक्य रहाणेबद्दल म्हणाला, ‘मला अजिंक्य रहाणेचा विक्रम मोडल्यावर खूप आनंद झाला आहे. तसेच रहाणे हा दिग्गज खेळाडू आहे. मी जेव्हा त्याला भेटेल तेव्हा या विक्रमाबद्दल नक्की सांगेल. तसेच मी त्याच्याकडूक काही सल्लेही घेईल.’
कर्णवीरने ही द्विशतकी खेळी करताना 202 चेंडूत 202 धावा केल्या आहेत. त्याने या खेळीत 18 चौकार आणि 9 षटकार मारले. त्याच्या या विक्रमाबद्दल त्याने सांगितले की त्याला फलंदाजी करत असताना याबद्दल काही माहित नव्हते. जेव्हा फलंदाजी करुन ड्रेसिंगरुममध्ये तो परतला तेव्हा त्याच्या प्रशिक्षकांनी आणि संघसहकाऱ्यांनी त्याला या विक्रमाची जाणीव करुन दिली.
याबरोबरच या सामन्यात कौशलने सलामीवीर फलंदाज विनित सक्सेनाबरोबर 296 धावांची सलामी भागीदारीही रचली. त्यांची ही भागीदारी भारतातील अ दर्जाच्या क्रिकेटमधील आणि विजय हजारे ट्रॉफीमधीलही सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली आहे.
याआधी शिखर धवन आणि आकाश चोप्रा यांच्या नावावर विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वोच्च सलामी भागीदारीचा विक्रम होता. त्यांनी दिल्लीकडून पंजाबविरुद्ध 2007-08 मध्ये 277 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी रचली होती.
या भागीदारीविषयी कौशल म्हणाला, त्याच्या खेळीत विनितचे मोठे योगदान होते. तो त्याला खेळताना प्रेरणा देत होता.
कौशलने क्रिकेटमध्ये जरी हे मोठे विक्रम केले असले तरी तो टेबल टेनिसचाही चाहता असून त्याने राष्ट्रीय स्तरावरही टेबल टेनिस खेळले आहे. पण शाळेत 10 वीत असताना तो मित्रांबरोबर कसोटी सामना पहायला गेला. त्यानंतर त्याला त्याच्या मित्रांनी क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.
महत्वाच्या बातम्या-
- …जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेटचा रतीब लावणारा गोलंदाज बनतो गायक
- श्रीलंकेला विश्वचषक जिंकून देणाऱ्या जयसुर्यावर आयसीसीने केले भ्रष्टाचाराचे आरोप
- माझी कारकिर्द सुरू होण्याअगोदरच असे आरोप का?- उसेन बोल्ट