आयपीएल २०२१ हंगामातील १२ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघांत सोमवारी(१९ एप्रिल) खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने विजय साजरा केला. चेन्नईचा हा स्पर्धेतील दुसरा विजय आहे. या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टी२० क्रिकेटमध्ये एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली.
धोनीचा कर्णधार म्हणून टी२० क्रिकेटमध्ये विक्रम
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी हा आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्याच नेतृत्वात चेन्नईने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले असून, तब्बल १० वेळा प्ले ऑफपर्यत मजल मारण्याचा कारनामा केला. तसेच, धोनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू देखील आहे.
सोमवारच्या सामन्यात मैदानावर उतरताच एमएस धोनीने चेन्नईसाठी कर्णधार म्हणून २०० सामने पूर्ण केले. एकाच संघासाठी अशी कामगिरी करणारा तो टी२० क्रिकेटमधील पहिला कर्णधार आहे. धोनीने २००८ ते २०२१ या काळात ही कामगिरी केली. २०१६ व २०१७ अशी दोन वर्षे तो रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा भाग होता. धोनीने आयपीएलमध्ये चेन्नईचे १७७ सामन्यात नेतृत्व केले आहे. तर, उर्वरित २३ सामने त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये चेन्नईचा कर्णधार या नात्याने खेळले आहेत.
A match made in heaven 😍
MS Dhoni is all set to Captain @ChennaiIPL for the 200th time.#VIVOIPL pic.twitter.com/1dS3bEzZDR
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2021
चेन्नईचा सलग दुसरा विजय
नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी करावी लागली. फाफ डू प्लेसीस, सुरेश रैना व अंबाती रायडू यांनी छोट्या-छोट्या भागीदार्या करत संघाला सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने नेले. ड्वेन ब्राव्होने अखेरीस २० धावांची नाबाद खेळी करून चेन्नईला १८८ धावांपर्यंत मजल मारून दिली. राजस्थानसाठी युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने सर्वाधिक तीन बळी मिळविले.
प्रत्युत्तरात, जोस बटलर वगळता राजस्थानच्या इतर फलंदाजांनी चेन्नईच्या गोलंदाजांसमोर अक्षरशः नांगी टाकली. बटलरने सर्वाधिक ४९ धावा बनविल्या. चेन्नईसाठी मोईन अलीने ३ बळी मिळवत राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. अखेरीस राजस्थानला ४५ धावांनी स्पर्धेतील दुसरा पराभव पत्करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
चौदा वर्षात कोणाला न जमलेला ‘हा’ विक्रम धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने करून दाखवला
…आणि धोनीला डाईव्ह माराताना पाहून चाहत्यांना झाली २०१९ विश्वचषकातील ‘त्या’ घटनेची आठवण
CSK vs RR : चेन्नईचे गोलंदाज राजस्थानच्या फलंदाजांना पडले भारी, चेन्नईचा ४५ धावांनी दणदणीत विजय