मुंबई। शनिवारी (२४ एप्रिल) इंडियन प्रीमीयम लीग २०२१ हंगामातील १८ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार ओएन मॉर्गन दुर्दैवीरित्या धावबाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एक नकोसा विक्रम कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या नावावर झाला आहे.
दुर्दैवीरित्या धावबाद झाला मॉर्गन
झाले असे की ११ व्या षटकात ख्रिस मॉरिस राजस्थानकडून गोलंदाजी करत होता. त्यावेळी कोलकाताकडून खेळपट्टीवर राहुल त्रिपाठी आणि त्याच्याबरोबर सुनील नारायण बाद झाल्याने नुकताच मैदानावर आलेला मॉर्गन होते. या षटकातील दुसरा चेंडू मॉरिसने फुल लेंथचा टाकला. त्यावर राहुल त्रिपाठीने जोरदार स्ट्रेट ड्राईव्ह मारला.
मात्र, हा चेंडू नॉन-स्ट्रायकरला असलेल्या मॉर्गनच्या बॅटला लागून उडून तिथेच पडला. पण त्रिपाठी धाव घेण्यासाठी पळाला होता. तसेच मॉर्गनलाही काय झाले हे कळाले नसल्याचे तोही धाव घेण्यासाठी धावला. पण चेंडू तिथेच पडल्याचे लक्षात येताच दोन्ही फलंदाज माघारी फिरले, मात्र मॉर्गन क्रिजमध्ये येईपर्यंत ख्रिस मॉरिसने चेंडू उचलला आणि स्टंपला लावला. त्यामुळे मॉर्गनला चक्क एकही चेंडू न खेळता शुन्य धावेवर धावबाद होऊन माघारी परतावे लागले.
केकेआरच्या नावावर नकोसा विक्रम
मॉर्गन एकही चेंडू न खेळता शुन्यावर बाद झाल्याने केकेआरचा एखादा खेळाडू डायमंड डकवर बाद होण्याची घटना सातव्यांदा घडली. यापूर्वी ६ वेळा केकेआर संघाचे खेळाडू डायमंड डकवर बाद झाले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा खेळाडू डायमंड डकवर बाद होणाऱ्या संघांच्या यादीत केकेआर संघ दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर मुंबई इंडियन्स संघ आहे. त्यांचे खेळाडू ९ वेळा डायमंड डकवर बाद झाले आहेत.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पंबाज किंग्स असून त्यांचे ६ वेळा खेळाडू डायमंड डकवर बाद झाले आहेत. तसेच त्यापाठोपाठ चौथ्या क्रमांकावर संयुक्तरित्या चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आहे. त्यांचे प्रत्येकी ५ वेळा खेळाडू डायमंड डकवर बाद झाले आहेत. त्यापाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आहेत, त्यांचे अनुक्रमे ३ वेळा आणि २ वेळा खेळाडू डायमंड डकवर बाद झाले आहेत.
डायमंड डक म्हणजे काय?
एखादा खेळाडू एकही चेंडू न खेळता खेळाडू बाद झाला (नॉन स्ट्रायकर एंडला रन आउट होणे/ वाईड बॉलवर रन आउट किंवा यष्टिचीत होणे) तर त्याला ‘डायमंड डक’ म्हटले जाते.
मॉर्गन आयपीएल २०२१मध्ये डायमंड डकवर बाद होणारा दुसरा खेळाडू
आयपीएल २०२१ हंगामात डायमंड डकवर बाद होणारा मॉर्गन हा पहिला खेळाडू नाही. त्याच्यापूर्वी २१ एप्रिल रोजी झालेल्या पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघातील सामन्यात पंजाबचा निकोलस पूरन हा फलंदाजही डायमंड डकवर बाद झाला होता.
राजस्थानचा विजय
शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १३३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३६ धावा केल्या होत्या. तर दिनेश कार्तिकने २५ आणि नितीश राणाने २२ धावांची खेळी केली. अन्य कोणाला खास काही करता आले नाही. राजस्थानकडून ख्रिस मॉरिसने ४ षटकात २३ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल, १३४ धावांचा आव्हानाचा पाठलाग राजस्थानने १९ व्या षटकात ४ विकेट्स गमावून सहज पार केला. राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद ४२ धावांची खेळी केली. त्याला शिवम दुबेने २२ धावा करत आणि नंतर डेव्हिड मिलरने नाबाद २४ धावा करत चांगली साथ दिली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने ४ षटकात ३२ धावा देत सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
तू सदैव प्रेरणास्थान राहशील! हरभजन सिंगच्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मराठमोळ्या शुभेच्छा
व्हिडिओ : कमनशिबी मॉर्गन! विचित्र पद्धतीने झाला रन आउट, एकही चेंडू न खेळताच आला माघारी
चल बेटा सेल्फी लेले रे! रियान पराग-राहुल तेवतियाचे अनोखे सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ






