सध्या मुंबई येथे वुमेन्स प्रीमियर लीगचा पहिला हंगाम खेळला जात आहे. स्पर्धेच्या प्ले ऑफ्समध्ये मुंबई, दिल्ली व युपी संघाने मजल मारली असून, गुजरात व बेंगलोरला आपला गाशा गुंडाळावा लागला. असे असतानाच स्पर्धेबाबतचा पहिला वाद आता नव्याने चिघळण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत गुजरातने लिलावात खरेदी केलेली वेस्ट इंडीजची दिग्गज क्रिकेटपटू डिएंड्रा डॉटिन हिने आपल्याला संघाबाहेर केल्या गेलेल्या घटनेचा उलगडा केला आहे.
वेस्ट इंडीजची माजी कर्णधार असलेल्या डॉटिन हिला गुजरातने लिलावात 60 लाख रुपयांना खरेदी केले होते. यानंतर ती संघात सहभागी देखील झाली होती. मात्र, स्पर्धा सुरू होण्याच्या अगदी काही तास आधी तिला संघातून बाहेर करत, ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू किम गार्थ हिला संघात सामील केले गेलेले. डॉटिन पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचा अहवाल देत गुजरातने तिला संपूर्ण हंगामातून बाहेर केलेले. आता या घटनेवर स्वतः डॉटिन प्रथमच खुलेपणाने बोलली. ती म्हणाली,
“जे घडले ते दुर्दैवी होते. माझी तब्येत बरोबर नव्हती असे कारण मला बाहेर करताना दिले गेले. डिसेंबर 2022 मध्ये माझ्यावर शस्त्रक्रिया झालेली आणि 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत मला विश्रांती करण्याचा सल्ला दिलेला. यानंतर 20 फेब्रुवारी रोजी मी माझा मेडिकल रिपोर्ट गुजरात फ्रॅंचायजीला सोपवला देखील होता. त्यानंतर मी संघाच्या नेट सेशनमध्ये काम केले. मी प्रामाणिकपणे संघाच्या फिजियोंना सर्व परिस्थिती सांगितली होती. तंदुरुस्त असताना देखील अशा प्रकारे मी या स्पर्धेतून बाहेर गेले याचे वाईट वाटते. एका ऐतिहासिक स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचा भाग होता आले नाही, हे निराशाजनक आहे.”
डॉटिनने मागील वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. महिला क्रिकेटमधील सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून तिची ओळख आहे.
(Diandra Dottin Open Up On His Exclusion In Gujarat Giants WPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुलच्या प्रदर्शनात कमी नाही! माजी क्रिकेटपटूंना फक्त मसाला हवा
“टप्प्याचा विचार करू नकोस फक्त वेगात चेंडू टाक”, उमरानला संघसहकाऱ्याचा सल्ला