क्रिकेट हा सांघिक खेळ. ११ क्रिकेटर्स आपल्या देशासाठी, आपल्या टीमसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत जिंकण्यासाठी जोर लावताना दिसतात. खेळ चांगला होतो संघ जिंकतो, आणि विजयाची माळ मॅन ऑफ द मॅचच्या रूपात एकाच खेळाडूच्या गळ्यात पडते. आता कितीहि सांघिक खेळ असला तरी, वैयक्तिक कामगिरीला येथे महत्त्व प्राप्त होतेच. खेळाडूंचे कौतुकही वैयक्तिकरित्या होत असते. एक खेळाडू मोठा झाला की, कधी कधी दुसऱ्या खेळाडूच्या चाहत्यांना त्याच्याविषयी असूया वाटू लागते. मीडियामध्ये बातम्या येत राहतात. या खेळाडूचं त्या खेळाडूशी बिनसलं. दोघातून विस्तवही जात नाही. अशा नानाविध वावड्या उठवल्या जातात. प्रत्यक्षात ते दोन्ही खेळाडू अतिशय चांगले मित्र असतात. एकमेकांचे कौतुक करत असतात आणि बाहेर त्यांना बदनाम केले जाते. भारतीय क्रिकेटमध्येही अशी जोडी होऊन गेली, ज्यांच्यात पूर्ण करियर दरम्यान वाद असल्याचे सांगितले गेले. मात्र, ते दोघे एकमेकांचा सन्मान करतात हे कोणी सांगताना दिसले नाही. तीच भारतीय क्रिकेटमधील सर्वात जास्त चर्चा झालेली जोडी म्हणजे एमएस धोनी आणि वीरेंद्र सेहवाग.
धोनीचं करियर सुरू झालं २००४ च्या शेवटी. दुसरीकडे सेहवाग त्याला चार-पाच वर्ष सीनियर. सेहवाग ओपनर तर धोनी मिडल ऑर्डर बॅटर. दोघांच्या खेळाची स्टाईल एकच ‘हान की बडीव धुरळा उडीव.’ भारतीय क्रिकेटच वाटोळं करून चॅपेल ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. २००७ टी२० वर्ल्डकप आला होता. सगळे सीनियर मंडळी म्हटली आम्ही थांबतो आम्हाला खेळायचं नाही. वर्ल्डकपला टीम तर पाठवायची होती. कॅप्टन राहुल द्रविड, सचिन, गांगुली खेळणार नव्हते, मग कॅप्टन कोण? असा प्रश्न होता. आघाडीवर दोन नावं, उरलेल्यांपैकी सर्वात सीनियर असलेले वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग. बरं याआधी झालेल्या एकमेव इंटरनॅशनल टी२० भारताचा कॅप्टन होता सेहवाग. त्यामुळे त्यालाच कॅप्टन बनवला जाईल अशी दाट शक्यता होती. मात्र, बीसीसीआयने अचानक घोषणा केली, टी२० वर्ल्डकपला भारताचा कॅप्टन असेल एमएस धोनी. बस इथूनच तथाकथित धोनी-सेहवाग वादाची बीजे रोवली गेली.
सारा वर्ल्डकप ठीक गेला, टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचली. फायनलची प्लेइंग इलेव्हन आली, तेव्हा त्यात सेहवागचे नाव नव्हते. चर्चेला उधाण आले, धोनीने डाव साधला, सेहवागला ऐतिहासिक फायनलमधून बाहेर बसवले. मात्र, वस्तुस्थिती वेगळी होती. फायनलआधी अचानक सेहवागला पाठदुखीचा त्रास सुरू झालेला. या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याला खेळवायची धोनीची इच्छा होती, पण सेहवागला बॅट लिफ्ट करताना त्रास होत होता. अखेर नाईलाजाने युसूफ पठाणला चान्स देण्यात आला. भारताने वर्ल्डकप जिंकला आणि सेहवाग-धोनी वादाचा पहिला चॅप्टर संपला.
हेही पाहा- अखंड भारतात होते चर्चा, पण Virender Sehwag आणि MS Dhoni मधील मतभेद कितपत खरे
या तथाकथित वादाचा दुसरा चॅप्टर सर्वाधिक गाजला. वर्ष होते २००९. टीम इंडिया इंग्लंडमध्ये टी२० वर्ल्डकप खेळत होती. पहिली मॅच भारताने पाकिस्तानला हरवून जिंकली. मात्र, तिकडे भारतीय मीडियात धोनी सेहवाग वाद असल्याच्या चर्चेने जोर धरलेला. ६ जून रोजी बांगलादेशविरुद्ध मॅच होणार होती. या मॅच आधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मात्र धोनीने एक कधीही न पाहिलेली घटना घडवून आणली. प्रेस कॉन्फरन्स संपण्याच्या काही मिनिटे आधी त्याने सेहवागसह पूर्ण टीमलाच प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलावले आणि स्टेटमेंट दिले की, भारतीय मीडिया दाखवत असलेल्या माझ्या आणि सेहवागच्या वादात काहीही तथ्य नाही. ही बेजबाबदार पत्रकारिता आहे. या प्रकाराने साऱ्यांची तोंडे बंद झाली.
शेवटचा तिसऱ्या चॅप्टरने सर्वात जास्त फुटेज खाल्ले. कारण, मीडिया वाढलेली आणि सोशल मीडियाची सुरुवात झालेली. २०१२ला ऑस्ट्रेलियात धोनीने गंभीर, सचिन आणि सेहवाग आलटून-पालटून संधी देण्याचा विचार करत, रोटेशन पॉलिसी सुरू केली. त्यावेळी हे प्रकरण चांगलेच गाजले. मात्र, सत्यता ही होती की, सेहवागचा फॉर्म गेलेला. तो चष्मा लावून खेळू लागलेला. फिटनेससही म्हणावा तसा नव्हता. धोनीने सरळ सांगितले होते की, २०१५ वर्ल्डकपसाठी आत्ताच टीम बनवायची आहे. याचा विचार केला तर सेहवाग त्यात फिट बसत नव्हता.
ही झाली ग्राउंडवरची आणि करिअर दरम्यानची बात. आता सेहवागचा स्वभाव कसा फटकळ आहे हेच आपण सर्वजण जाणतो. तो काहीही बोलताना भीडभाड ठेवत नाही. त्याच्या स्वभावाचा विचार केला तर, त्याने धोनीसोबत खरंच वाद असता तर, काहीतरी स्टेटमेंट नक्कीच दिले असते. ज्याप्रकारे गंभीर-इरफान-हरभजन कधीतरी धोनीविषयी सुप्त नाराजी व्यक्त करत असतात, तसे सेहवाग कधीच बोलताना दिसत नाही. तो नेहमी त्याचे कौतुकच करतो. ज्यावेळी सेहवागने रिटायरमेंटनंतर सेहवाग इंटरनॅशनल स्कूलची सुरुवात केली, तेव्हा त्याचा चीफ गेस्ट होता एमएस धोनी.
मीडियाने आपला टीआरपी वाढावा म्हणून या नसलेल्या वादाला जन्म दिला, पण शेवटी सेहवाग आणि धोनीने एकच उत्तर दिले, “तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रतिभा असूनही मुंबई इंडियन्सने सलग दोन वर्षे अर्जुनला फक्त बेंच गरम करत का ठेवलंय?
भारतीय खेळाडूंच्या जर्सी नंबरमागील फंडा आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर
तब्बल ३४ वर्षे जुन्या प्रकरणात नवज्योतसिंग सिद्धूंना तुरुंगवासाची शिक्षा, काय होतं ते प्रकरण?