भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्याच सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला ८ गड्यांनी लोळवले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या अफलातून गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी नांगे टाकल्या. परिणामी भारताला एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला एक सल्ला दिला आहे.
ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय
ऍडलेड येथे संपलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला अवघ्या अडीच दिवसात पराभूत केले. भारताच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स व जोश हेजलवूड यांनी भारताचा डाव अवघ्या ३६ धावांवर संपवला. विजयासाठी मिळालेले ९० धावांचे लक्ष ऑस्ट्रेलियाने सलामीवीर ज्यो बर्न्सच्या अर्धशतकामुळे दोन गडी गमावत पूर्ण केले.
राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा
भारताच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयला सल्ला दिला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वेंगसरकर म्हणाले, “भारतीय संघाला मदत करण्यासाठी बीसीसीआयने राहुल द्रविडला त्वरीत ऑस्ट्रेलियाला पाठवावे. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर कशाप्रकारे फलंदाजी करावी याचे मार्गदर्शन द्रविडव्यतिरिक्त कोणीही चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी गेली दहा महिने बंद असल्याने द्रविड ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो. बीसीसीआयने द्रविडच्या अनुभवाचा वापर करून घ्यायला हवा. द्रविड आत्ता गेला तर त्याला दोन आठवडे विलगीकरणात राहावे लागू शकते. मात्र, तो सिडनी येथील तिसऱ्या कसोटीपूर्वी संघाला मार्गदर्शन करण्यास उपलब्ध होईल.”
द्रविडने ऑस्ट्रेलियात केली आहे दमदार कामगिरी
द्रविडने ऑस्ट्रेलियात नेहमीच दमदार कामगिरी केली होती. भारताने २००४ मध्ये जिंकलेल्या ऍडलेड कसोटीचा द्रविड नायक होता. द्रविडने त्या सामन्यात २३३ चेंडूत ७२ धावांची खेळी खेळली होती. या मालिकेच्या चार कसोटी सामन्यांत १२३.४ च्या सरासरीने ६१९ धावा काढल्या होत्या ज्यात तीन अर्धशतके व एका शतकांचा समावेश होता. सध्या द्रविड बेंगलोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक आहे.
संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– राहुल द्रविडच्या देखरेखीखाली हिटमॅनने घेतले प्रशिक्षण; एनसीएत गाळतोय घाम
– टीम इंडियाला रोहित शर्माची नितांत गरज, लवकरात लवकर संघात सहभागी करावे;