भारत आणि श्रीलंका हे शेजारी राष्ट्र वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (2 नोव्हेंबर) आमने सामने आले. उभय संघांतील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी भारतासाठी उत्कृष्ट खेळी केली. दुसरीकडे श्रीलंकेसाठी वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका याने महत्वाच्या विकेट्स घेतल्या. सूर्यकुमार यादव याची विकेट घेताच मदुशंका याचे नाव खास यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले.
दिलशान मदुशंका (Dilshan Madushanka) श्रीलंकेसाठी या सामन्यात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. डावातील आपल्या 10 षटकांमध्ये 80 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. सूर्यकुमार यादव याच्या रुपात त्याला सामन्यातील चौथी विकेट मिलाली. त्याचसोबत या विकेटसह तो विश्वचषक 2023 हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील ठरला. मधुशंकाने यावर्षी विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये आतापर्यंत 18 विकेट्स घेतल्या आहेत. यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ऍडम झॅम्पा आहे, ज्याने 6 सामन्यांमध्ये 16 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यादीत तिसऱ्या क्रमांकावर शाहीन शाह आफ्रिदी आहे, ज्याने पाकिस्तासाठी 7 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेततल्या आहेत.
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात भारताला नाणेफेक जिंकता न आल्यामुळे रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील संघ प्रथम फलंदाजीला उतरला. विराट कोहली आणि शुबमन गिल ही जोडी संघासाठी दोन शतके करणार, असे सर्वांना वाटत असतानाच गिलने 92, तर विराटने 88 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकांमध्ये श्रेयस अय्यर यानेही महत्वपूर्ण धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या नुकसानावर 357 धावा केल्या.
(Dilshan Madushanka became the highest wicket taker in World Cup 2023)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.
श्रीलंका – पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महीश थीक्षणा, कसून रजिथा, दुष्मंथ चमीरा, दिलशान मदुशंका.