शुक्रवारी(28 जून) विश्वचषक 2019 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात 35 वा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला 9 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. पण त्याचबरोबर त्यांचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या नावावर एक नकोसा विक्रमही झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले होते. त्यामुळे श्रीलंकेकडून सलामीला करुणारत्ने आणि कुशल परेरा उतरले.
मात्र रबाडाने या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर करुणारत्नेला बाद केले. त्याचा झेल दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या फाफ डु प्लेसिसने घेतला. त्यामुळे करुणारत्ने विश्वचषकातील एका सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे, तर जागातील एकूण पाचवा खेळाडू ठरला आहे.
याआधी न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू जॉन राईट हे 1992 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना पहिल्याच चेंडूवर बाद झाले होते. विशेष म्हणजे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला हा 1992 च्या विश्वचषकातील पहिलाच सामना होता.
त्यांच्यानंतर 2003 च्या विश्वचषकात बांगलादेशचा क्रिकेटपटू हनन सरकार श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. तसेच 2011 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेचा ब्रेंडन टेलर कॅनडा विरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.
त्याचबरोबर 2019 च्या या विश्वचषकात करुणारत्नेच्या आधी न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल विंडीज विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यामुळे करुणारत्ने हा या विश्वचषकात असा बाद होणारा दुसरा खेळाडू ठरला आहे.
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्वबाद 203 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांन्डो आणि कुशल परेराने सर्वाधिक 30-30 धावांची खेळी केली. तर दक्षिण आफ्रिकेकडून ख्रिस मॉरिस आणि ड्वेन प्रिटोरियसने सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
त्यानंतर 204 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने 37.2 षटकात 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. दक्षिण आफ्रिकेकडून फाफ डुप्लेसिसने नाबाद 96 धावा आणि हाशिम अमलाने नाबाद 80 धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने एकमेव विकेट घेतली.
विश्वचषकातील सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद होणारे फलंदाज –
जॉन राईट – 1992 विश्वचषक (विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
हनन सरकार – 2003 विश्वचषक (विरुद्ध श्रीलंका)
ब्रेंडन टेलर – 2011 विश्वचषक (विरुद्ध कॅनडा)
मार्टिन गप्टिल – 2019 विश्वचषक (विरुद्ध विंडीज)
दिमुथ करुणारत्ने – 2019 विश्वचषक (विरुद्ध दक्षिण आफ्रिका)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–खुद्द रोहित शर्मानेच दिला विंडीज विरुद्ध तो नाबाद असल्याचा पुरावा
–…म्हणून कारकिर्दीत आलेल्या परिवर्तनाबद्दल शमीने दिले स्वत:लाच श्रेय
–सॅल्यूट सेलिब्रेशनची कॉपी करण्याबद्दल शमीला शेल्डन कॉट्रेलने दिले हिंदीत उत्तर






