टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 मध्ये भारतीय संघाला खूप मोठा धक्का बसला. रविवारी (दि.30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळल्या गेलेल्या सुपर-12 फेरीच्या सामन्यात भारत 5 विकेट्सने हरला. सामना हरला मात्र भारताच्या एका खेळाडूने संघाची चिंता वाढवली आहे. अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक जखमी झाला, त्याच्यामुळे भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याला दुखापतीमुळे मैदान सोडून जावे लागले. त्याला पाठीच्या खालच्या भागात वेदना जाणवल्या, ज्यानंतर तो भारतीय संघाचे फिजीयो कमलेश जैन (Kamlesh Jain) यांच्यासोबत बाहेर जाताना दिसला. ही घटना 15व्या षटकानंतरची आहे. यानंतर भारतीय संघाचा दुसरा यष्टीरक्षक रिषभ पंतने त्याची जागा घेतली आणि यष्टींच्या मागची जबाबदारी सांभाळली.
टी20 विश्वचषक सुरू होण्याआधी देखील भारतीय संघाला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि दीपक चाहर (Deepak Chahar) यांच्या दुखापतीमुळे बाहेर जाण्याने तगडा झटका लागलेला होता. तसेच या सामन्यात कार्तिक फलंदाजीत काही खास योगदान करू शकला नाही आणि 15 चेंडूत 6 धावा बनवतं तंबूत परतला.
रिषभ पंतने 16 ते 20 षटकांपर्यंत यष्टीरक्षण केले
रिषभ पंत (Rishabh Pant) याने 16 षटकांपासून ते 20 षटकांपर्यंत कार्तिकच्या जागी यष्टीरक्षण केले. पंतला या स्पर्धेत आतापर्यंत प्लेइंग इलेवनमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. भारतीय संघ आतापर्यंत तीन सामने खेळला आहे पण पंत अजूनही बाकावरच बसून आहे. याआधी देखील कार्तिकला शनिवारी सरावाच्या दरम्यान इजा झालेली. कार्तिकची इजा किती गंभीर आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखी खाली आहे.
बांग्लादेश विरूद्ध रिषभ पंत उतरणार मैदानात
टी20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत भारताचा पुढचा सामना बुधवारी (2 नोव्हेंबर ) बांग्लादेश विरूद्ध खेळणार आहे. कार्तिकला स्कॅन करण्यासाठी घेऊन जाण्यात येईल, त्यानंतर रिपोर्ट्सवरून त्याचा पुढच्या सामन्यासाठी विचार केला जाईल. पण, जर तो बांग्लादेश विरूद्ध सामना खेळू शकला नाहीतर पंतला त्याच्या जागी घेतले जाऊ शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेकडून झालेला पराभव हा शुभसंकेत! आता टीम इंडिया जिंकणार वर्ल्डकप?
VIDEO: अश्विनकडे होती डेविड मिलरला ‘रनआऊट’ करण्याची संधी, मात्र त्याने पुढे जे केले…