ऑस्ट्रेलियात सुरू असलेला टी20 विश्वचषक संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात टी20 आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाला न्यूझीलंड दौरा करायचा आहे. तसेच डिसेंबर महिन्यात भारत वनडे आणि कसोटी मालिकेसाठी बांगलादेशला जाईल. बीसीसीआयने सोमवारी (31 ऑक्टोबर) या दोन्ही दौऱ्यांसाठी एकूण चार संघ घोषित केले आहेत. यातील न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याला संधी मिळालेली नाही. त्याची निवड न झाल्याने तो आता भविष्यात भारतीय संघासाठी खेळण्याची शक्यता मावळली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने 2022 आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी शानदार कामगिरी केली होती. फिनिशर म्हणून त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली. याच कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला भारतीय संघात पुनरागमनाची संधी देण्यात आली. त्याने या संधीचे सोने करत सर्व सामन्यांमध्ये संघासाठी मोलाची कामगिरी केली. याच कामगिरीमुळे त्याची टी20 विश्वचषकात प्रमुख यष्टीरक्षक म्हणून निवड केली गेली. विश्वचषकात त्याची कामगिरी तितकीशी चांगली झालेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले होते. बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पुढच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता देखील कमी आहे.
कार्तिकच्या वयाचा व भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा विचार केल्यास कार्तिकला पुढे संधी मिळणे अवघड दिसते. सध्या भारतीय संघात ईशान किशन, रिषभ पंत व संजू सॅमसन या युवा यष्टीरक्षक फलंदाजांचा समावेश आहे. तसेच हे सर्वजण कार्तिकची जागा घेण्यासाठी सक्षम दिसून येतात.
सध्या 37 वर्षांच्या असलेल्या कार्तिकने भारतासाठी 2004 मध्ये पदार्पण केले होते. मात्र, यष्टीरक्षक म्हणून एमएस धोनीने सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने कार्तिकला मर्यादित संधी मिळाल्या. यादरम्यान त्याने अनेक वेळा संघात पुनरागमन केले. 2018 मध्ये त्याने आपला अखेरचा कसोटी तर, 2019 विश्वचषकात त्याने आपला अखेरचा वनडे सामना खेळला होता. त्याने कसोटी व वनडेत अनुक्रमे 1025 व 1752 धावा केल्या असून, 56 टी20 सामने खेळताना त्याच्या नावे 672 धावा जमा आहेत.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार/ यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी बीसीसीकडून एकूण चार संघांची घोषणा
फलंदाजांप्रमाणेच गोलंदाजांची भागादारीही महत्वाची, अर्शदीपने ‘या’ सहकाऱ्याला दिले यशाचे श्रेय






