2025 चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. परंतु या मेगा इव्हेंटसाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. बीसीसीआय विजय हजारे ट्रॉफी संपण्याची वाट पाहत आहे. रिपोर्ट्सनुसार, 19 जानेवारी रोजी संघाची घोषणा होऊ शकते.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या करुण नायरनं निवडकर्त्यांसह सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यानं स्पर्धेत आतापर्यंत 752 च्या सरासरीनं तेवढ्याच धावा केल्या. तो 7 डावांमध्ये फक्त एकदाच बाद झाला आहे. त्यानं आतापर्यंत 5 शतकं आणि 1 अर्धशतक झळकावलंय. करुण नायरच्या नेतृत्वाखाली विदर्भाचा संघ स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचला आहे. आता विजेतेपदाच्या सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
33 वर्षीय करुण नायरनं आपल्या उत्कृष्ट कामगिरीनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला दावा ठोकला आहे. मात्र टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकच्या मते, नायरला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळणार नाही. या मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय संघ जवळजवळ तयार असल्याचं कार्तिकचं मत आहे. “करुण नायर ज्या फॉर्ममध्ये आहेस ते पाहून खूप आनंद होतो. मयंक अग्रवालही खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण हे अशा वेळी घडत आहे जेव्हा भारतीय एकदिवसीय संघ जवळजवळ तयार आहे. संघात आता फारसे बदल करता येणार नाहीत”, असं कार्तिक म्हणाला.
कार्तिक पुढे बोलताना म्हणाला, “करुण नायरला संघात आणणं खूप आकर्षक आहे. त्यानं या चर्चेचा भाग होण्याचा अधिकार मिळवला आहे. पण मला वाटत नाही की तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्थान मिळवू शकेल. जर तो असाच खेळत राहिला तर भविष्यात का नाही? तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि तो वेगवान आणि फिरकी दोन्ही गोलंदाजी उत्तम खेळतो. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे.”
कार्तिकला खात्री आहे की, टी20 आणि कसोटी क्रिकेटमध्ये चमक दाखवणाऱ्या यशस्वी जयस्वालची इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात निवड होईल. कार्तिक म्हणाला, “जयस्वालला इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याचा ऑस्ट्रेलिया दौरा बराच काळ चालला, जो एका तरुण खेळाडूसाठी थकवणारा आहे. त्याला विश्रांतीची गरज आहे. परंतु मला खात्री आहे की, तो इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 100 टक्के खेळेल.”
हेही वाचा –
नितीश कुमार रेड्डीचं नशीब चमकलं, मुख्यमंत्र्यांकडून मिळालं लाखोंचं बक्षीस
BCCI; नियमांचे उल्लंघन केल्यास खेळाडूंवर होणार कडक कारवाई, पाहा काय आहे शिक्षा
IPL 2025; केएल राहुल नाही तर हा खेळाडू होऊ शकतो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार