न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 0-3 असा क्लीन स्वीप झाला. टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या पराभवामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून कर्णधार रोहित शर्मावरही निशाणा साधला जात आहे.
कर्णधारपदासोबतच रोहित संपूर्ण मालिकेत बॅटनंही फ्लॉप ठरला. मालिकेत त्याच्या बॅटमधून केवळ एक अर्धशतक निघालं. रोहित बहुतेक वेळा त्याच्या आक्रमक वृत्तीमुळे सुरुवातीच्या षटकांमध्येच बाद झाला. आता भारताचा माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक यानं रोहितच्या फ्लॉप कामगिरीमागचं कारण सांगितलं आहे. यासह कार्तिकनं रोहितला विशेष सल्लाही दिला.
रोहित शर्मा गेल्या काही काळापासून कसोटीत बॅटनं झगडत आहे. त्याचा संघर्ष न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही पाहायला मिळाला. या मालिकेत रोहितनं 3 सामन्यांच्या 6 डावात 15.16 च्या सामान्य सरासरीनं केवळ 91 धावा केल्या, ज्यात 52 धावांच्या खेळीचा समावेश आहे. बाकीचे भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांविरुद्ध झुंजताना दिसले, तर रोहितला वेगवान गोलंदाजांनी त्रास दिला. मुंबईतही रोहित मॅट हेन्रीविरुद्ध दोन्ही डावात बाद झाला होता.
दिनेश कार्तिक ‘क्रिकबझ’वर म्हणाला, “जेव्हा रोहित शर्मानं सलामीला येण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला त्याच्या तंत्रावर विश्वास होता, जो आता दिसत नाही. आक्रमण करणं हा एक पर्याय आहे, परंतु जर तुम्ही तुमच्या तंत्रावर विश्वास ठेवला तरच ते अधिक चांगलं आहे. कारण तुम्हाला भीती वाटते की तुम्ही बचाव करताना किंवा सॉफ्ट शॉट खेळताना आऊट होऊ शकता. म्हणूनच तुम्ही आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहात. जर यानं काम केल नाही, तर हे फार वाईट दिसतं.”
रोहित शर्मा संपूर्ण मालिकेत ज्याप्रकारे फ्लॉप झाला आहे, त्यामुळे त्याच्यावर बरीच टीका होत आहे. आता ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्यासमोर धावा काढण्याचं मोठं आव्हान असेल.
हेही वाचा –
विराट-रोहितला कसोटीतून ड्रॉप करण्याची वेळ आली आहे का? आकडेवारी जाणून घ्या
40 वर्षीय भारतीय यष्टीरक्षकाची निवृत्तीची घोषणा, 2010 मध्ये केलं होतं पदार्पण
विराट-रोहित सारख्या दिग्गजांनी दुलीप ट्रॉफी खेळण्यास नकार दिला होता, कारण धक्कादायक!