भारतीय संघाचे तीन दिग्गज खेळाडू सध्या अडचणीत आहेत. पहिलं नाव आहे कर्णधार रोहित शर्माचं. दुसरं नाव आहे माजी कर्णधार विराट कोहलीचं आणि तिसरा आहे अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन. गेल्या पाच सामन्यांमध्ये या तिघांची कामगिरी चांगली झालेली नाही.
घरच्या मैदानावरील या पाच सामन्यांपैकी संघानं दोन सामने जिंकले आणि तीन गमावले. अशा स्थितीत या खेळाडूंनी घरच्या हंगामापूर्वी दुलीप करंडक स्पर्धेत भाग घ्यायला हवा होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता एका अहवालात दावा केला गेला आहे की, या दिग्गजांनी टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांची दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्याची विनंती फेटाळून लावली होती आणि ही स्पर्धा खेळून कोणताही फायदा होणार नाही असं म्हटलं होतं.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची रोहित, विराट आणि अश्विनसह अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी दुलीप ट्रॉफी खेळून कसोटी सामन्याचा सराव करावा अशी इच्छा होती. परंतु या दिग्गजांनी त्यांची विनंती फेटाळून लावली. सर्व खेळाडू जवळपास महिनाभर विश्रांतीवर होते. बहुतेक तज्ञांनी न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या खराब कामगिरीचं कारण सामन्याच्या सरावाचा अभाव आणि खराब शॉट सिलेक्शनला दिलं आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी केली. येथे भारताला घरच्या कसोटी मालिकेत पहिला व्हाईटवॉश (किमान तीन सामने) सहन करावा लागला. याआधीही माजी क्रिकेटपटूंनी दुलीप ट्रॉफीमध्ये भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंचा सहभाग न होण्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांनी सर्व अव्वल खेळाडूंना 5 ते 22 सप्टेंबर दरम्यान बंगळुरू आणि अनंतपूर येथे आयोजित दुलीप ट्रॉफीमध्ये भाग घेण्याची योजना आखली होती, जेणेकरून त्यांना कसोटी सामन्यांचा सराव करता येईल. कोहली आणि रोहित सारख्या खेळाडूंनी सुरुवातीला सहमती दर्शवली होती, परंतु नंतर त्यांनी खेळण्याची प्रेरणा मिळत नसल्याचं कारण देत आपली नावं मागे घेतली.
या अहवालात पुढे म्हटलं आहे की, रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांच्या निर्णयानंतर निवडकर्त्यांनी दुलीप ट्रॉफीमध्ये सहभागी होण्याचं मान्य करणाऱ्या रवींद्र जडेजालाही सोडण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिल, सरफराज खान, रिषभ पंत, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर या भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
हेही वाचा –
‘ते अजूनही खेळाडूंना समजून घेतायत’, कसोटी मालिका गमावल्यानंतर कोचिंग स्टाफबद्दल रोहितचे मत
गौतम गंभीर आणि रोहित शर्माच्या रणनितीवर संतापले संजय मांजरेकर, पराभवावर काय म्हणाले?
“माझे आणि माझ्या कुटुंबाचे…”, राजस्थान रॉयल्सने रिलीज केल्यानंतर बटलरची भावनिक पोस्ट