आयपीएल 2023 मधील अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवरील झालेल्या या सामन्यात गुजरातने शुबमन गिल याच्या शतकाच्या जोरावर सहा गडी राखून विजय मिळवला. या पराभवामुळे आरसीबीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या दिनेश कार्तिक याचे अपयश कायम राहिले. या महत्त्वाच्या सामन्यातही तो खाते खोलू शकला नाही. त्यासोबतच त्याच्या नावे आयपीएल इतिहासातील सर्वात जास्त शून्याची नोंद झाली.
आरसीबीला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. मात्र, विराट कोहली वगळता इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. दिनेश कार्तिक या सामन्यात देखील अपयशी ठरला. पहिल्याच चेंडूवर गोल्डन डक होत त्याने तंबूचा रस्ता धरला. विशेष म्हणजे तो या हंगामात तब्बल चार वेळा शून्यावर बाद झाला. त्याने या हंगामात 13 सामने खेळताना 11.67 च्या सरासरीने 140 धावा केल्या.
गुजरातविरुद्ध शून्यावर बाद होताच त्याने रोहित शर्माला मागे टाकत आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे नोंद केला. कार्तिक याच्या नावे आता आयपीएलमध्ये 17 शून्य जमा झाले आहेत. तर रोहित 16 शून्यांसह दुसऱ्या स्थानी दिसून येतो. या व्यतिरिक्त मंदीप सिंग व सुनील नरीन हे प्रत्येकी 15 वेळा खाते खोलण्यात अपयशी ठरले आहेत.
गुजरातविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात केवळ विजयच आरसीबीला प्ले ऑफमध्ये घेऊन जाणार होता. विराट कोहली याने आपला दमदार फॉर्म कायम राखत, सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. विजयासाठी मिळालेले 198 धावांचे आव्हान गिलने नाबाद शतक पूर्ण झळकावत अगदी सहजतेने गाठून दिले. त्यामुळे आरसीबीच्या पदरी पराभव पडला.
(Dinesh Karthik Registered Most Ducks In IPL History Surpass Rohit Sharma)