---Advertisement---

त्रागा भोवला; फायनलपूर्वी दिनेश कार्तिकला बीसीसीआयची फटकार, ‘ते’ कृत्य केल्याने झाली शिक्षा

On: गुरूवार, ऑक्टोबर 14, 2021 11:21 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेतील दोन अंतिम संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघालाच पराभूत करत आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हे दोन्ही संघ शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. तत्पूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या एका खेळाडूला बीसीसीआयने फटकारले आहे.

हा सामना झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या ताफ्यात जल्लोषाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकवर कारवाई करण्यात आली आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर रागात हाताने स्टंप्स उखडले होते. याबरोबरच ड्रेसिंग रूमकडे जातानाही तो रागात दिसला होता. त्याने केलेले हे वर्तन आयपीएलच्या आचारसंहितेच्या नियमांच्या बाहेरचे असल्याने बीसीसीआयने त्याला फटकारले आहे.

याबाबत आयपीएलने निवेदनात म्हटले की, “कोलकाता नाईट रायडर्स संघाचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात लीगच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. दिनेश कार्तिकने लेव्हल १ च्या कलम २.२ चे उल्लंघन केले आहे. तसेच त्याने आपली चूक देखील मान्य केली आहे. लेव्हल १ च्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर संघांच्या रेफरींचा निर्णय अंतिम निर्णय असतो.”

कोलकाता नाईट रायडर्सची अंतिम षटकात बाजी 
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने १ चौकार आणि २ षटकार मारले होते. तर श्रेयस अय्यरने नाबाद ३० धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला होता. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ५ बाद १३५ धावा करण्यात यश आले होते.

कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयासाठी १३६ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली होती. तर शुबमन गिलने ४६ धावांचे योगदान दिले होते. तर शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. या षटकात आर अश्विनने पहिल्या ४ चेंडूवर २ गडी बाद करत १ धाव खर्च केली होती. त्यानंतर शेवटच्या २ चेंडूंमध्ये ६ धावांची आवश्यकता असताना राहुल त्रिपाठीने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

चेन्नईसाठी विजेतेपदाचं स्वप्न तितके सोपेही नाही! कोलकाताचा ‘हा’ रेकाॅर्ड तोंडात बोटे घालायला लावणारा

फायनलपूर्वी कोलकाताच्या गोटात चिंतेचे वातावरण! खुद्द कॅप्टन अडकलाय ‘शुन्या’च्या गर्तेत

…म्हणून तर हरूनही सर्वांच्या मनावर दिल्लीचेच राज्य! हा एक फोटो पाहा सगळं समजेल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---