निदाहास ट्रॉफी स्पर्धा संपल्याबरोबरच भारतीय संघाचा यावर्षीचा आंतराष्ट्रीय मोसमही संपला असून सर्वांना आता आयपीएलचे वेध लागले आहे. यावर्षीच्या आयपीएल मोसमात अनेक संघांना नवीन कर्णधार मिळाले आहेत. यात कोलकाता नाईट रायडर्सचाही समावेश आहे.
यावर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व भारताला रविवारी शेवटच्या चेंडूवर षटकार मारून निदाहास ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देणारा दिनेश कार्तिक करणार आहे. त्यामुळे कार्तिकसाठी नेतृत्वाची एक चांगली संधी चालून आली आहे.
असे असले तरी, कार्तिकने आज नेहमीच चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहिल्याचे सांगितले आहे. तसेच ते स्वप्न आता धूसर होत आहे असेही तो म्हणाला.
याबद्दल द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार त्याने सांगितले, “पहिल्याच वर्षी मी चेन्नईकडून खेळेल असा विचार केला होता. पण आता १० वर्षे झाले तरीही हे शक्य झाले नाही. आता हे स्वप्न दिवसेंदिवस धूसर होत चालले आहे. मी चेन्नई सुपर किंग्ससाठी कधी खेळेल माहित नाही.”
कार्तिक देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडू संघाकडून खेळतो. तसेच त्याचा जन्मही चेन्नईमध्ये झाला आहे त्यामुळे त्याला या शहराच्या फ्रॅन्चायझींकडून खेळण्याची इच्छा आहे. पण सध्यातरी त्याने कोलकाता संघाच्या नेतृत्वाच्या जाबदारीकडे लक्ष केंद्रित केले आहे.
याविषयी बोलताना कार्तिक म्हणाला, “माझा जन्म आणि शिक्षणही याच शहरात(चेन्नई) झाले आहे. मला चेन्नई संघाकडून खेळायला आवडले असते. पण आजच्या घडीला मला एका आयपीएल संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे आणि मला त्याला योग्य न्याय द्यायला आवडेल. मला असे वाटते की चेन्नई, बंगलोर, कोलकाता आणि मुंबई संघाला प्रामाणिक चाहते मिळाले आहेत.”
कार्तिकने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १५२ सामने खेळले असून यात त्याने २४.८१ च्या सरासरीने २९०३ धावा केल्या आहेत. तसेच त्याने १४ अर्धशतके केली आहेत. याबरोबरच यष्टीरक्षक म्हणून ८८ झेल आणि २६ यष्टिचित केल्या आहेत.