भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या इंग्लंडमध्ये समालोचनाचा आनंद घेत आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून कार्तिकने क्रिकेट समालोचनामध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत स्काय स्पोर्ट्सच्या समालोचन गटाचा भाग आहे. तो सध्या इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये समालोचन करत असला तरी, तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर तो समालोचनाला तात्पुरता निरोप देईल.
या कारणाने सोडणार समालोचन
दिनेश कार्तिकला आता एक खेळाडू म्हणून मैदानात परतावे लागणार आहे. तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) यष्टीरक्षक फलंदाज आहे आणि त्याची तयारी करण्यासाठी त्याला संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये संघात सामील व्हावे लागेल. आयपीएलचा दुसरा भाग १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. ओएन मॉर्गन उपलब्ध नसल्यास त्याच्याकडे कर्णधारपद देखील सोपवले जाऊ शकते. त्याने यापूर्वी तीन हंगामात केकेआरचे नेतृत्व केले होते.
समालोचन सोडताना दिली अशी प्रतिक्रिया
तिसऱ्या कसोटीनंतर समालोचनक गटामधून बाहेर पडणार असल्याची पुष्टी करताना कार्तिक म्हणाला,
“आयपीएल दोन आठवड्यांच्या कालावधीत सुरू होईल. त्यासाठी मी जमेल तेवढी तयारी करू इच्छितो. मी उर्वरित दोन कसोटींसाठी येथे असणार नाही. तुम्ही लोक माझ्याशी छान वागलात.”
कार्तिकने आंतरराष्ट्रीय सामन्यांसह द हंड्रेड लीगमध्ये देखील समालोचन केले होते.
पहिल्या टप्प्यात राहिली होती अशी कामगिरी
सध्या ३६ वर्षाच्या असलेल्या कार्तिकने आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात सात सामन्यांत १२३ धावा केल्या आहेत. त्याची फ्रँचायझी केकेआरने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या जागी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीचा संघात समावेश केला आहे. कमिन्स आयपीएलच्या उर्वरित भागात सहभागी होणार नाही. आयपीएलच्या पूर्वार्धात केकेआरची कामगिरी बरीच निराशाजनक झाली आहे. त्यांनी पूर्वार्धात एकूण ७ सामने खेळले आणि केवळ २ सामन्यात विजय मिळवू शकले. केकेआरला त्यांच्या उर्वरित ७ सामन्यांमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिस केर्न्सच्या प्रकृतीत झाला बिघाड; शस्त्रक्रियेनंतर पायाकडील भागांना मारला लकवा
जेव्हा विवियन रिचर्ड्स लिटिल मास्टरला म्हणाला होता, “यू आर मेड ऑफ स्टील मॅन”
क्रिकेटविश्वातील ‘फॅब फोर’ने केव्हा ठोकली होती अखेरची शतके, वाचा सविस्तर