भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावले आहेत. आता मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी भारताचा माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक यानं भारतीय टीम मॅनेजमेंटला काही सूचना दिल्या आहेत.
दिनेश कार्तिकच्या मते, जसप्रीत बुमराहनं शेवटचा कसोटी सामना खेळू नये. कार्तिकनं बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला खेळवण्याचा सल्ला दिला आहे. सिराज बंगळुरू येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला होता. मात्र त्यानंतर टीम मॅनेजमेटनं पुणे कसोटीत त्याला बाहेर बसवून आकाशदीपला खेळवलं होतं.
जसप्रीत बुमराह गेल्या काही काळापासून सातत्यानं कसोटी क्रिकेट खेळत आहे. त्यानं बांगलादेशविरुद्ध मालिकेतील दोन्ही सामने खेळले होते. यानंतर त्यानं न्यूझीलंडविरुद्ध देखील मालिकेतील पहिले दोन सामने खेळले. मात्र न्यूझीलंडविरुद्ध त्याची कामगिरी फारशी खास राहिलेली नाही. बुमराहनं 2 कसोटी सामन्यात फक्त 3 विकेट घेतल्या आहेत. पुणे कसोटीत तर त्याला एकही बळी मिळाला नाही.
पुणे कसोटीनंतर ‘क्रिकबझ’शी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, “जसप्रीत बुमराहला निश्चितपणे आरामाची आवश्यकता आहे. असं झालं तर मोहम्मद सिराज संघात येऊ शकतो. मी दुसऱ्या कोणत्याही बदलाचा विचार करत नाही. मला वाटत नाही की, या सामन्यात खेळलेल्या अन्य फलंदाजांना आणि गोलंदाजांना पुन्हा संधी का मिळू नये.”
कार्तिक पुढे बोलताना म्हणाला, “मी स्पष्टपणे विचार करू शकत नाहीये की भारताची प्लेइंग एलेव्हन काय असेल, मात्र माझ्या मते वेळ फार कमी आहे. जर मला लगेच काही निर्णय घ्यायचा असेल, तर मी म्हणेन बुमराहला विश्रांती द्या आणि मोहम्मद सिराजला पुन्हा संधी द्या.”
हेही वाचा –
“खडतर आव्हान द्यायचे होते…”, किवी कर्णधाराने सांगितले न्यूझीलंडच्या विजयाचे रहस्य
लाजिरवाण्या पराभवानंतर टीम मॅनेजमेंट ॲक्शन मोडवर, वानखेडे कसोटीपूर्वी घेतला हा मोठा निर्णय!
हा खेळाडू होऊ शकतो पाकिस्तानचा नवा कर्णधार, PCB लवकरच घेणार मोठा निर्णय!