सेंच्युरियन । भारतीय संघातील दुखापतग्रस्त वृद्धिमान सहाच्या जागी दिनेश कार्तिक या खेळाडूची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात बदली खेळाडू म्हणून निवड झाली आहे. तिसऱ्या सामन्यापूर्वी दिनेश कार्तिक संघासोबत दिसेल.
११ जानेवारी रोजी सहा दुखापग्रस्त झाला होता. भारतीय क्रिकेट बोर्डाची मेडिकल टीम त्याकडे लक्ष ठेवून आहे.
दिनेश कार्तिक भारताकडून २३ कसोटी सामने खेळला असून त्याने शेवटचा कसोटी सामना १७ जानेवारी २०१० रोजी बांगलादेश संघाविरुद्ध खेळला आहे. तब्बल ७ वर्षांनी त्याला पुन्हा भारतीय संघात संधी मिळू शकते.
मोठा योगायोग:
२००६-०७ साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना भारतीय सलामीवीर विरेंद्र सेहवाग दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हा तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी दिनेश कार्तिकला बदली खेळाडू म्हणून बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या सामन्यात दिनेश कार्तिकला सलामीला खेळण्याची संधी मिळाली होती आणि त्यात त्याने ६३ धावा केल्या होत्या. या दौऱ्यात पहिला सामना भारतीय संघ जिंकला होता तर पुढचे दोन सामने संघ पराभूत झाला होता.
त्यावेळी एबी डिव्हिलिअर्स आणि हाशिम अमला हे संघांचे भाग होते तर आजही ते खेळाडू दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना दिसतात. या मालिकेत दुसऱ्या सामन्यात मोर्ने मॉर्केल या खेळाडूने कसोटी पदार्पण केले होते.
विशेष म्हणजे त्या संपूर्ण कसोटी दौऱ्यात सध्या भारतीय संघात खेळत असलेल्या संघातील कोणताही खेळाडू नव्हता.
५७ वर्षांत प्रथमच एका दौऱ्यात ३ विकेटकिपर
एकाच कसोटी मालिकेत तीन विकेटकिपरचा समावेश असण्याची ५७वर्षांतील ही पहिलीच वेळ असणार आहे. शेवटच्या कसोटी सामन्यात संघात एक आणि राखीव मध्ये दोन असे एकूण तीन खेळाडू आपण पाहू शकतो.