– शंतनु कुलकर्णी
२४ सप्टेंबरपासुन २०१९ च्या विजय हजारे चषकाला(Vijay Hazare Trophy) बेंगलोर, वडोदरा, जयपुर व डेहराडुन येथे सुरुवात झाली आहे. तब्बल ३८ संघांची ४ गटात विभागणी करण्यात आली आहे.
त्यात गट अ व गट ब मध्ये प्रत्येकी ९ संघांचा तर गट क व प्लेट गटात प्रत्येकी १० संघांचा समावेश करण्यात आला आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात खेळणाऱ्या तामिळनाडु संघाचा क गटात समावेश आहे. पहिल्या सामन्यांत राजस्थानचा ६ गड्यांनी पराभव करत तामिळनाडु संघाने धडाक्यात सुरुवात केली होती.
त्यानंतर २५ सप्टेंबरला तमिळनाडूचा सामना सर्विसेस विरुद्ध पार पडला. या सामन्यात तमिळनाडूने २१२ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयात तमिळनाडूचा कर्णधार दिनेश कार्तिकने(Dinesh Karthik) ९५ धावांची खेळी करत तर गोलंदाजीत क्रिष्णमुर्ती विग्नेशने ५ बळी घेत महत्त्वाचा वाटा उचलला.
या सामन्यात सर्विसेसचा कर्णधार रजत पालिवालने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सर्विसेसचा पुल्कित नारंग पहिलाच अ दर्जाचा सामना खेळत होता.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या तामिळनाडुच्या सलामीवीर जगदिशन व अभिनव मुकुंदकडुन चांगल्या सलामीची अपेक्षा होती. पण ७.४ षटकांत २२ धावांत सलामीवीर माघारी परतल्यानंतर साई किशोर (१५) व बाबा अपराजीत (१७) ने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ५५ धावांत ४ गडी गमावल्यानंतर कर्णधार दिनेश कार्तिक मैदानात उतरला.
राजस्थानविरुद्धच्या सामन्यांत नाबाद ५२ धावांची खेळी केल्याने कार्तिकचा आत्मविश्वास वाढला होता. कार्तिकने नवोदित फलंदाज हरी निशांथला सोबत घेत डाव तर सावरलाच पण त्यासोबतच मोठ्या धावसंख्येचा भक्कम पाया बांधला. आपल्या दुसऱ्याच अ दर्जाच्या सामन्यांत अर्धशतक झळकावत निशांथने कर्णधाराला योग्य साथ दिली.
शेवटी फिरकी गोलंदाज अर्जुन शर्माने निशांथला ७३ धावांवर बाद करत १४४ धावांची भागिदारी तोडली आणि सर्विसेस संघाला मोठ यश मिळवून दिले होते. निशांथनंतर दिनेश कार्तिक ९५ धावांवर बाद झाला. दोन झटपट गडी बाद झाल्याने तामिळनाडुचा संघ २८० धावांचा टप्पा पार करु शकेल की नाही असे दिसत होते.
पण एम मोहम्मद (३६) व शाहरुख खान (२३) च्या फटकेबाजीमुळे तामिळनाडुचा संघ ५० षटकांत २९४ धावांपर्यंत पोहचु शकला. सर्विसेसकडुन वरुण चौधरी व रजत पालिवालने प्रत्येकी २ गडी बाद केले.
२९५ धावांचे आव्हान सर्विसेसच्या संघासाठी सोपे नव्हते. त्यामुळे त्यांना चांगल्या सलामीची आवश्यकता होती. नकुल वर्मा (२०), रवी चौहान (११) व राहुल सिंग (१७) ने संघाला चांगल् सुरुवात देण्याचा प्रयत्न केला.
११.१ षटकांत सर्विसेसने ३ गडी गमवत ५४ धावा केल्या होत्या. पण १२ षटकांत ३ गडी गमावल्याने डाव सांभाळण्याची जबाबदारी आली होती ती कर्णधार रजत पालिवल व देवंद्र लोचाबवर. मात्र ते ही पुर्णपणे अपयशी ठरले.
युवा जलदगती गोलंदाज क्रृष्णमुर्ती विग्नेशच्या गोलंदाजीसमोर सर्विसेसच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. पुढिल केवळ २८ धावांत सर्विसेसने शेवटचे ७ गडी गमावले आणि सर्विसेसचा डाव १९.१ षटकांत ८२ धावांत आटोपला. तब्बल २१२ धावांनी विजय मिळवत तामिळनाडुने सलग दुसरा विजय मिळवला.
तमिळनाडूकडून विग्नेशने ४१ धावांत ५ गडी बाद केले. त्याला एम मोहम्मदने १० धावांत ३ गडी बाद करत चांगली साथ दिली आणि विजयात महत्त्वाची भुमिका निभावली. सर्विसेसचा पुढील सामना २७ सप्टेंबरला त्रिपुरासोबत तर तामिळनाडुचा पुढील सामना २८ सप्टेंबर रोजी बिहारसोबत खेळविण्यात येणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
-युवराज म्हणतो, तर मी अजून एक विश्वचषक खेळलो असतो!
–सौरव गांगुली पुन्हा एकदा सांभाळणार ही महत्त्वाची जबाबदारी
–जेव्हा पुण्याचा २२ वर्षीय ऋतुराज गायकवाड एमएस धोनीला करतो इंप्रेस…