जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) (IPL) सर्वात मोठी व्यवसायिक क्रिकेट लीग मानली जाते. यामध्ये जगभरातील मान्यवर क्रिकेटपटू खेळताना दिसतात. या स्पर्धेच्या चौदाव्या हंगामाचे विजेते ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा प्रमुख अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) याने संघाविषयी तसेच आपल्या चाहत्यांविषयी महत्त्वाची विधाने केली.
एका भारतीय वृत्तसंस्थेशी बोलताना ब्राव्होने सीएसके, संघातील आपले सहकारी, चाहते व कर्णधार एमएस धोनी यांच्याविषयी दिलखुलास मते मांडली. तो म्हणाला,
“माझ्यासाठी आणि संघासाठी हा विशेष हंगाम होता. कारण गेल्या हंगामात आम्ही सातव्या स्थानावर राहिलो होतो. आयपीएलच्या इतिहासात सीएसके प्लेऑफसाठी अपात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर, सर्व खेळाडूंनी शानदार पुनरागमन केले आणि चाहत्यांना दाखवून दिले की आम्ही गेल्या हंगामापेक्षा खूपच सरस आहोत.”
ब्राव्होने आपले म्हणणे पुढे नेताना म्हटले, ”गेल्या हंगामात कोणीही आमच्यावर विश्वास ठेवला नव्हता. कारण त्यांनी आम्हाला आयपीएलचे आजोबा म्हटले होते. परंतु, आम्ही सर्व शंका खोट्या ठरवल्या आणि पुन्हा इतिहास रचला. चेन्नई सुपर किंग्सच्या यशाचा एक भाग बनताना मला खूप आनंद होत आहे. आम्ही आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी आयपीएल फ्रँचायझींपैकी एक आहोत.” ब्राव्हो आयपीएल २०२१ मध्ये फलंदाजीत अयशस्वी ठरला नव्हता. मात्र, गोलंदाजीत त्याने नेहमीप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली.
सध्या ३८ वर्षाचा असलेला ब्राव्हो आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी विदेशी खेळाडू आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्स संघासह केली होती. मात्र, २०११ आयपीएल हंगामापासून तो चेन्नई संघाचा भाग आहे. २०१६ व २०१७ अशी दोन वर्ष तो गुजरात लायन संघासाठी खेळला. मात्र, त्यानंतर तो पुन्हा चेन्नईशी जोडला गेला. तो आयपीएलमध्ये लसिथ मलिंगा व अमित मिश्रा यांच्यानंतर सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघात रंगणार ७२ वी ऍशेस मालिका; कुठे, कधी पाहू शकाल पहिला सामना, जाणून घ्या
न्यूझीलंडला धक्का! केन विलियम्सन ‘इतक्या’ दिवस राहणार क्रिकेटपासून दूर
आता टिकाकारांची बसणार दातखिळी! ‘आऊट ऑफ फॉर्म’ हार्दिकने फिटनेसवर सुरू केलंय काम- Video