टी20 विश्वचषकात पाकिस्तानवर विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर हा पेशानं सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तो ‘ओरॅकल’ या कंपनीत काम करतो, जिथे त्यानं विश्वचषकात खेळण्यासाठी रजा घेतली आहे!
सौरभला मैदानावर असताना फलंदाजांना त्रास देण्यात आणि मैदानाबाहेर असताना ‘कोडिंग’ करण्यात रस आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजानं सुपर ओव्हरमध्ये गतवेळच्या उपविजेत्या पाकिस्तानला 19 धावांचं लक्ष्य गाठू दिलं नाही. यानंतर तो क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय बनला आहे.
सौरभनं ‘पीटीआय’शी बोलताना सांगितलं की, “हा केवळ एकच सामना होता, ज्यात आम्ही चांगली कामगिरी केली. आता आमचं लक्ष पुढच्या सामन्यावर असलं पाहिजे. अमेरिकेच्या संघातील सर्व खेळाडू त्यांची कामगिरी अधिक चांगली कशी होईल यासाठी प्रयत्न करत आहेत.”
सौरभ पुढे बोलताना म्हणाला, “मला कधीही दबाव जाणवला नाही. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आवडते तेव्हा ती तुमच्यासाठी ओझं नसते. त्यामुळे जेव्हा मी मैदानावर असतो तेव्हा मला गोलंदाजी करणं आणि फलंदाजांना त्रास देणं आवडतं. जेव्हा मी कोडिंग करत असतो, तेव्हा मी त्यात रमून जातो. म्हणूनच मला, मी काहीही जबरदस्तीनं करतोय असं कधीच वाटत नाही.”
सौरभ नेत्रावळकरनं 2010 मध्ये भारतासाठी अंडर 19 विश्वचषक खेळला आहे. या स्पर्धेत त्यानं जोस बटलर, जो रूट आणि बेन स्टोक्स सारख्या इंग्लंडच्या फलंदाजांनी गोलंदाजी केली होती. त्यावेळी त्याच्यासोबत सघात जयदेव उनाडकट आणि संदीप शर्मासारखे गोलंदाज होते.
कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर सौरभला यूएसएच्या कॉर्नेल विद्यापीठात एमएस करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. मात्र तो कधीही क्रिकेटपासून दूर जाऊ शकला नाही आणि त्यानं अमेरिकेत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून स्वत:ची ओळख निर्माण केली. आता तो त्या देशाकडून टी20 विश्वचषकात खेळतोय!
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानला पाणी पाजणाऱ्या सौरभ नेत्रावळकरचा मराठमोळा अंदाज! सलील कुलकर्णींनी शेअर केला सुरेल आवाजाचा व्हिडिओ
पाकिस्तानची नाचक्की! सुपर ओव्हरमध्ये महाराष्ट्राच्या पोराकडून चारीमुंड्या चीत, इतिहासातील सर्वात वाईट पराभव
कोण आहे सौरभ नेत्रावळकर? सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला चारली धूळ, लिंकडीन प्रोफाईलचा स्क्रिन शॅाट व्हायरल