आयपीएल 2026 (IPL 2026) संपल्यानंतर टीम इंडियाचे वेळापत्रक अत्यंत व्यग्र असणार आहे. बीसीसीआय अशा एका योजनेवर विचार करत आहे, ज्यामध्ये एकाच वेळी भारताचे दोन वेगळे संघ दोन वेगवेगळ्या स्पर्धा खेळू शकतील. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणारे आशियाई खेळ (Asian Games) आणि वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका या दोन्ही स्पर्धांच्या तारखा एकाच वेळी येत आहेत. त्यामुळे दुसऱ्या संघात अनेक तरुण खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन (R. Ashwin) या कल्पनेवर चांगलाच भडकला आहे.
आर. अश्विनने आपल्या चॅनेलवर बीसीसीआयच्या या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली आहे. त्याच्या मते, भारतीय कॅपचे मूल्य कमी होईल. अश्विन म्हणाला, जर असे झाले तर भारतीय संघाच्या कॅपची (टोपीची) किंमत काय राहील? ती कॅप घालताना तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, कारण तुम्ही संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करत असता. आजकाल खेळाडू संघात पदार्पण तर करतात, पण नंतर लोक त्यांना विसरून जातात.
प्रत्येक खेळाडूला आपल्या चाहत्यांसमोर पदार्पण करायचे असते आणि सर्व फॉरमॅटमध्ये खेळायचे असते. अशा प्रकारे सर्रास संधी दिल्याने त्याचे गांभीर्य संपते. दोन वेगळे भारतीय संघ बनवण्याऐवजी अश्विनने बीसीसीआयला ‘इंडिया ए’ संघावर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय कॅपला महत्त्व असायला हवे. जर तुम्हाला तरुणांना मोठ्या मंचावर संधी द्यायची असेल, तर त्यांना ‘इंडिया ए’ सोबत दौऱ्यावर पाठवा. तुम्ही इतक्या सहजासहजी कोणालाही ‘इंडिया कॅप’ देऊ शकत नाही. त्यापेक्षा ‘इंडिया ए’ च्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण (Telecast) सुरू करा, जेणेकरून लोक ते सामने पाहू शकतील. पण अशा प्रकारे टीम इंडियाची कॅप फुकट वाटू नका, तिचे मूल्य टिकवून ठेवा.





