जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पंधराव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. या हंगामासाठी खेळाडूंना कशाप्रकारे कायम केले जाईल याबाबतची माहिती समोर आली असून, सर्व संघांनी त्यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. अशातच चेन्नई सुपर किंग्स संघाचे संघमालक एन श्रीनिवासन यांनी संघाचा कर्णधार एमएस धोनी याला रिटेन करण्याविषयी महत्त्वपूर्ण विधान केले.
माझ्यासाठी जास्त पैसे खर्च करू नका
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एन श्रीनिवासन म्हणाले,
“धोनी एक निष्पक्ष व्यक्ती आहे. त्याला कायम ठेवण्यासाठी संघाने जास्त पैसा खर्च करावा असे त्याला वाटत नाही. त्यामुळे संघाने आपल्याला कायम करू नये असे त्याला वाटते. मात्र, पुढील हंगामात धोनीने आमच्या संघातून खेळावे, अशी माझी इच्छा आहे. मी संघमालक असलो तरी संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर कोणत्याही प्रकारे प्रभाव टाकत नाही.”
चेन्नई आहे विद्यमान विजेता
एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने यावर्षीच्या हंगामात विजेतेपद पटकावले असले तरी त्याला फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने १६ सामन्यात १६ च्या सरासरीने ११४ धावा केल्या. त्याने नाबाद १८ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट फक्त १०७ होता. धोनी सध्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा मेंटर म्हणून काम पाहतोय.
पुढील वर्षी असेल वेगळे प्रारूप
आयपीएल २०२२ मध्ये ८ ऐवजी १० संघ उतरतील. याशिवाय ६० ऐवजी ७४ सामने खेळवले जातील. मात्र, प्रत्येक संघ पूर्वीप्रमाणे केवळ १४-१४ सामने खेळणार आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये मेगा लिलाव होऊ शकतो. दोन नवीन संघांची भर पडल्याने ५० नवीन खेळाडूंना लीगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मुंबई इंडियन्सने पाच वेळा तर, चेन्नईने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलेय. लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ आयपीएलमध्ये सहभागी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
“भारतीय संघाप्रती थोडी मवाळ भूमिका घ्या आणि थोडी सहानुभूती ठेवा”
लज्जास्पद! विराट-अनुष्काच्या १० महिन्यांच्या मुलीला आल्या हीन दर्जाच्या धमक्या
मानलं भाई! पहिल्याच विश्वचषकात हसरंगाने मारलं मैदान; पाहा जबरदस्त आकडेवारी






