भारतीय संघाचा अष्टपैलून खेळाडू हार्दिक पंड्या मागच्या जवळपास दोन वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. नुकत्याचा पार पडलेल्या टी२० विश्वचषकात त्याने निराशाजनक प्रदर्शन केले. या दरम्यानच्या काळात हर्दिकच्या फिटनेसविषयी सतत तक्रारी समोर आल्या आहेत. त्याच्या कंबरेला झालेल्या दुखापतीमुळे त्याने शस्त्रक्रिया देखील केली होती. मात्र, तरीदेखील अपेक्षित सुधारणा पाहायला मिळालेली नाही. फिटनेसच्या कारणास्तव त्याने मागच्या दोन वर्षात खूपच कमी गोलंदाजी केली. परंतु, आता तो त्याच्या फिटनेसवर पूर्पणपे लक्ष केंद्रित करू इच्छित आहे.
हार्दिक आता त्याच्या फिटनेसवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे आणि त्याने याबाबत राष्ट्रीय निवडकर्त्यांना सांगितले आहे. फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो पुढच्या काही काळासाठी क्रिकेटपासून दुर राहणार आहे. यांच पार्श्वभूमीवर त्याने भारतीय संघाच्या राष्ट्रीय निवडकर्त्यांना सांगितल की, काही काळासाठी त्याच्या नावावर विचार करू नका. कारण, तो पूर्पपणे फिट होण्यावर लक्ष देत आहे. एका प्रमुख क्रीडा वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक गोलंदाज म्हणून पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्याने निवडकर्त्यांकडे काही वेळ मागितला आहे.
हार्दिक मागच्या बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असला तरी, त्याला अनेक मोठ्या संधी दिल्या गेल्या आहेत. यादरम्यान त्याने आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघासाठी खूपच खराब प्रदर्शन केले. त्याला टी२० विश्वचषकात देखील संधी दिली गेली होती. मात्र, तो याठिकाणी देखील अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. टी२० विश्वचषकात खेळलेल्या पाच सामन्यात त्याने फक्त दोन वेळा गोलंदाजी केली आणि एकही विकेट घेतला नाही.
टी२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी यूएईत आयपीएल खेळली गेली. यादरम्यान हार्दिकच्या फिटनेसवर सतत लक्ष ठेवले गेले. त्याने आयपीएल २०२१ च्या पूर्ण हंगामात एकदाही गोलंदाजी केली नाही. तसेच त्याने आयपीएल २०१९ आणि २०२० हंगाम देखील फलंदाजाच्या रूपात खेळले आहेत. त्याच्या खराब फिटनेस आणि फॉर्ममुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्या सध्या खेळल्या जाणाऱ्या मालिकेत त्याला संघातून वगळले गेले. असेही सांगितले जात आहे की, आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर देखील त्याला संधी दिली जाणार नाही.