सन २०१९ पासून आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरु केली. या स्पर्धा आता रंगत आली असून अंतिम सामन्यात जागा बनवण्यासाठी अनेक संघ एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत आणि इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे भाग आहेत. आत्तापर्यंत या स्पर्धेत काही फलंदाजांनी द्विशतकी खेळी केल्या आहेत. त्या यादीत शनिवारी(१६ जानेवारी) इंग्लंडचा कर्णधार जो रुटने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत द्विशतकी खेळी करत स्थान मिळवले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत द्विशतकी खेळी करणारा रुट नववा फलंदाज ठरला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ९ फलंदाजांनी मिळून एकूण ११ द्विशतकी खेळी केल्या आहे. या ९ फलंदाजांपैकी भारताचा मयंक अगरवाल आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांनी प्रत्येकी २ वेळा द्विशतक करण्याचा कारनामा केला आहे.
अन्य ७ जणांना प्रत्येकी १ वेळा द्विशतक आत्तापर्यंत करता आले आहे. या ७ फलंदाजांमध्ये रुट व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली, रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, मार्नस लॅब्यूशेन आणि जॅक क्रावली यांचा समावेश आहे.
द्विशतकवीर फॅब फोर –
विशेष म्हणजे सध्याच्या काळातील फॅब फोर समजल्या जाणाऱ्या विराट, विलियम्सन, स्मिथ आणि रुट या चौघांच्याही नावावर आता कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत द्विशतकाची नोंद झाली आहे.
इंग्लंडची आघाडी –
रुटने श्रीलंकेविरुद्ध १४ जानेवारीपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३२१ चेंडूत २२८ धावा केल्या. या खेळीत त्याने १८ चौकार आणि १ षटकार मारला. त्यामुळे इंग्लंडला श्रीलंकेविरुद्ध मोठी आघाडी घेण्यात यश आले. त्याच्यासह इंग्लंडकडून डॅनिएल लॉरेन्सने ७३ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त इंग्लंडकडून पहिल्या डावात कोणत्याच फलंदाजाला ५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांच्या खालोखाल जॉनी बेअरस्टोने ४७ धावांची खेळी केली.
इंग्लंडचा पहिला डाव ४२१ धावांवर संपुष्टात आला. तत्पूर्वी श्रीलंका संघ पहिल्या डावात १३५ धावांवर सर्वबाद झाला असल्याने इंग्लंडने २८६ धावांची भक्कम आघाडी घेतली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत द्विशतके करणारे फलंदाज –
स्टीव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड
मयंक अगरवाल – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
विराट कोहली – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
रोहित शर्मा – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
मयंक अगरवाल – भारत विरुद्ध बांगलादेश
डेविड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान
मार्नस लॅब्यूशेन – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड
जॅक क्रॉवली – इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान
केन विलियम्सन – न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज
केन विलियम्सन – न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान
जो रुट – इंग्लंड विरुद्ध श्रीलंका
महत्त्वाच्या बातम्या –
शुबमन गिल बॅटवरचे स्टिकर सिडनीतच विसरला? पाहा नक्की काय आहे प्रकरण
द्विशतक एक विक्रम अनेक! वाचा श्रीलंकाविरुद्ध डबल सेंचूरी करत जो रुटच्या नावावर झालेले रेकॉर्ड्स