नाशिक: नाशिककर सायकलीस्ट बंधूपैकी डेंटिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांनी दहा दिवस दहा तास आणि 1 मिनिटात पूर्ण केलेल्या के2के या काश्मीर ते कन्याकुमारी या 3850 किमीच्या यशस्वीपणे पूर्ण केलेल्या मोहिमेची अमरिकेतील वर्ल्ड अल्ट्रासायकलिंग असोसिएशनच्या, विक्रमांच्या वहीत नोंद झाली आहे. याबाबतचा ईमेल डॉ. महाजन यांना प्राप्त झाला असून डब्ल्यूयुसीएच्या संकेतस्थळावरही याबाबत नोंद झाल्याचे दिसत आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध अशी रेस ऍक्रॉस अमेरिका अर्थात रॅम स्पर्धा देखील डब्ल्यूयुसीएच्या नियमावलीनुसार चालत असल्याने या विक्रमाची नोंद एक विशेष बात असून यामुळे गिनीज बुकमध्ये होणाऱ्या नोंदीसही वेग मिळणार आहे.
काश्मीर ते कन्याकुमारी हे 3850 किमीचे अंतर 5 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2018 दरम्यान केवळ 10 दिवस 10 तास आणि 1 मिनिटात एकट्याने पूर्ण करण्याचा विक्रम डॉ. महेंद्र महाजन यांनी केला होता. या विक्रमाची नोंद घेण्यासाठी डब्ल्यूयुसीए तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यांना कळविण्यात आली होती. विशेष म्हणजे ही मोहीम विक्रमी काळात पूर्ण करण्यासाठी डब्ल्यूयुसीए आणि गिनीज कडून जास्तीतजास्त 12 दिवसांचा कालावधी मिळाला होता.
मोहीम पूर्ण झाल्यानंतर मोहिमेची संपूर्ण माहिती डब्ल्यूयुसीएला पाठविण्यात आली होती. त्याची योग्य दखल घेत संपूर्ण माहितीचे सत्यापन करून डब्ल्यूयुसीएने विक्रमाची खातरजमा करून अखेर क्रॉस कंट्री प्रकारात ‘इंडिया नॉर्थ टू साऊथ’ या नावाने विक्रमाची नोंद घेतली आहे.
या विक्रमाची नोंद करताना विक्रम पूर्ण करणाऱ्याचे मूळ गाव नाशिक, महाराष्ट्र अशी केली गेल्याचा खूप अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया डॉ. महाजन यांनी दिली आहे. डब्ल्यूयुसीएने मोहिमेबाबतचा संपूर्ण अनुभव नोंद पत्रिकेवर नोंदवून घेतला आहे. त्यांच्या संकेतस्थळावर हा अनुभव वाचण्यास उपलब्ध असल्याचे महाजन यांनी सांगितले.
महाजन बंधू फाउंडेशन आणि नाशिक सायकलीस्ट फाउंडेशन आणि जायंट स्टारकेन यांच्यातर्फे आयोजित या मोहिमेत ‘खेलो इंडिया’ आणि ‘तंबाखू बंद’ या उपक्रम तसेच तंबाखू बंद (Quit Tobacco) या अभियानाला समर्थन करण्यात आले.
या विक्रमच्या नोंदीचे संपूर्ण श्रेय डॉ. महाजन यांनी त्यांचे या मोहिमेतील क्रु मेंबर्स किशोर काळे, अॅड. कबीर राचुरे, अॅड. दत्ता चकोर, विजय काळे, सागर बोंदार्डे आणि संदीप परब तसेच बंधू सायकलिस्ट हितेंद्र महाजन, जायंट स्टारकेन कंपनीचे प्रवीण पाटील सर, प्रशिक्षक मितेन ठक्कर, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रविणकुमार खबिया आणि नाशिक सायकलिस्ट कुटुंबाला दिले आहे.