कोलकाता । आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याच्या विकेटवरून मोठा वाद झाला. हा संपूर्ण वाद रिचर्डसनच्या षटकात झाला.
सामन्यातील ४८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने रिचर्ड्सनचा चेंडू हवेत मारला. ह्याचा स्मिथने झेल घेतला. परंतु पंच अनिल चौधरी यांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला. त्यावेळी स्मिथने चेंडू रिचर्डसनकडे देत फलंदाजाला बाद करायला सांगितले. रिचर्डसनने फलंदाजाला धावबाद केले.
या सगळ्या काळात पंड्या बाद झाल्यामुळे मैदानात परतत होता आणि सोबतीला पाऊससही आला होता. त्यामुळे हा चेंडू नो बॉल आहे की नाही यासाठी पंचानी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. शेवटी हा नो बॉल असल्याचे घोषित करण्यात आले.
परंतु यात धावबादचे काय असा प्रश्न आला. ऑस्ट्रेलियन खेळाडू पंचांशी वाद घालू लागले. शिवाय चेंडू डेड झाला नसल्यामुळे बाद द्यावे असेही स्मिथ म्हणत होता. परंतु क्रिकेटच्या नियम क्रमांक २७.७ प्रमाणे जर गैरसमजातून फलंदाज मैदान सोडत असेल पंच हस्तक्षेप करून फलंदाजाला थांबवू शकतात. तसेच त्याला नाबाद देऊ शकतात. शिवाय हा चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करू शकतात. ह्याच नियमाच्या आधारावर आजच्या सामन्यात हार्दिक पंड्याला नाबाद देण्यात आले.
विशेष म्हणजे हा चेंडू नंतर डेड बॉल घोषित करण्यात आल्यावर नियमाप्रमाणे पुढचा चेंडू हार्दिक पंड्यानेच खेळणे अपेक्षित असताना भुवनेश्वर कुमार तो चेंडू खेळला.