आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (२८ एप्रिल) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा पराभव केला. पंजाबचा हा या हंगामातील पहिलाच पराभव होता. त्यामुळे हा विजय राजस्थानसाठी विशेष ठरला, मात्र त्याला गालबोट लागले. त्याला कारणीभूत त्यांचाच कर्णधार रियान पराग ठरला. त्याने या सामन्यादरम्यान ड्रेसिंग रुममध्ये वेपिंग केलेल्या कृत्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) त्याच्यावर कोणती कारवाई करतो, याकडे लक्ष होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने परागला त्याच्या या कृत्याबद्दल सामना शुल्काच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावला आहे. खेळाची प्रतिष्ठा मलिन झाल्याने त्याला हा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर त्याच्या खात्यावर एक ‘डिमेरिट पॉइंट’ही जमा झाला आहे.
बीसीसीआयने दिलेल्या नोटीसमध्ये, परागवर खेळाडू आचारसंहितेच्या कलम २.१ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा दाखल केला आहे. हे कलम खेळाडू आणि अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या नियम उल्लंघनांशी संबंधित आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात परागने ड्रेसिंग रुममध्ये वेपिंग (ई-सिगारेट ओढणे) केले होते.
आयपीएलच्या या १९ व्या हंगामासाठी परागचा करार १४ कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे त्याचे प्रतिसामना शुल्क १ कोटी रुपये होते, म्हणजेच २५ टक्के दंड अंदाजे २५ लाख रुपये होतात. त्याचा हा या हंगामातील पहिलाच गुन्हा असल्याने २५ लाख रुपयांचा दंड केला आहे. ई-सिगारेट ओढण्यास भारतात बंदी आहे. त्याचबरोबर सामन्यादरम्यान त्याने हे कृत्य केल्याने त्याला मंडळ कोणती कडक शिक्षा करतो, याची प्रतिक्षा होती.
परागने त्याची शिक्षा मान्य केल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. त्याबद्दल बीसीसीआयने सांगितले, “रियानने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२१ चे उल्लंघन केल्याचे आढळले आहे, जे खेळाची बदनामी करणाऱ्या वर्तनाशी संबंधित आहे. ही घटना दुसऱ्या डावादरम्यान घडली. रियान ड्रेसिंग रुममध्ये वेप करताना दिसला. त्याने आपला गुन्हा मान्य केला असून सामनाधिकारी अमित शर्मा यांनी दिलेली शिक्षाही स्विकारली आहे.”
आयपीएलची प्रतिष्ठा अबाधित राहावी हे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, दोषी संघ, त्याचे अधिकारी आणि संबंधित खेळाडू यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी इतर पर्यायांची चाचपणी देखील बीसीसीआयकडून केली जात आहे.
मुल्लाणपूरमध्ये झालेल्या या पीबीकेएसने दिलेले २२३ धावसंख्येचे लक्ष्य आरआरने ४ चेंडू आणि ६ विकेट्स शिल्लक राखत जिंकला होता.






