सध्या सुरु असलेल्या दुबई ओपन सुपर सिरीज फायनलमध्ये भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूचा काल दुसरा सामना होता. या सामन्यात सिंधूने सहज विजय मिळवून स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला.
सिंधूचा हा सामना जपानच्या सायको साटो विरुद्ध होता. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सिंधूने सायको साटोला जिंकण्याची एकही संधी दिली नाही.
३५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंधूने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या सेटमध्ये तिने उत्तम खेळ करत साटोला २१-१३ अशा फरकाने पराभूत केले आणि सामन्यात आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटमध्ये तिने सामान्यातील आघाडी कायम ठेवत साटोला पूर्णपणे निष्प्रभ केले आणि या सेटमध्ये २१-१२ अशा फरकाने विजय मिळवून सामनाही जिंकला.
सिंधू या स्पर्धेत अ गटातून खेळत आहे. आजच्या विजयामुळे तिने उपांत्य फेरीतील जागा जवळ जवळ पक्की केली आहे. तिचा आजचा साखळी फेरीतील शेवटचा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जपानच्या अकान यामागूचीशी होणार आहे.