दुबई । भारताच्या पीव्ही सिंधूने दुबई सुपर सिरीज फायनल्स स्पर्धेत अंतिम सामन्यात जपानच्या अंकाने यामागूचीला २१-१५, १२-२१, १९-२१ असे पराभूत झाली. तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी सिंधू ही केवळ चौथी भारतीय खेळाडू ठरली होती. यापूर्वी २०११मध्ये भारताची साईना नेहवाल महिला एकेरीत तर २००९मध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजू यांनी महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली होती.
पहिला सेट २१-१५ असा जिंकणाऱ्या सिंधूला दुसऱ्या सेटमध्ये मात्र जोरदार पराभवाला सामोरे जावे लागले. तिला दुसऱ्या सेटमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या यामागूचीने १२-२१ असे पराभूत केले.
तिसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने पहिल्यापासून आघाडी घेतली. ३-० अशा आघडीवर असणाऱ्या सिंधू पुढे ही आघाडी ५-३ अशी वाढवली परंतु यामागूचीने ही आघडी जास्त वेळ टिकून दिली नाही. तिने चांगला खेळ करत ५-५ अशी बरोबरी केली. पुढे ही आघाडी अनुभवाच्या जोरावर कमी करत सिंधूने १०-७ अशी आघाडी घेतली. सामन्यात मिळालेली आघडी सिंधूला फार काळ टिकवता आली नाही आणि यामागूचीने ११-१० अशी आघडी कमी केली.
यावेळी पुन्हा चांगला खेळ करत सिंधूने आघाडी १२-१० अशी केली. पुन्हा आघाडी कमी करताना सिंधू-यामागूचीमध्ये तब्बल ३१ शॉट्सची रॅली झाली. पुढे सामन्यात १५-१५ अशी बरोबरी झाली. दोन्हीही खेळाडूंची चांगलीच दमछाक झाली होती. शेवटी हा सेट सिंधू १९-२१ असा पराभूत झाली.
साखळी सामन्यात सिंधूने यामागूचीला सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. यामागूचीला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या तर सिंधू तिसऱ्या स्थानी आहे.