क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती म्हणजे अंपायर. दोन प्रमुख अंपायरसह एक टेलिव्हिजन अंपायर, आणि एक रिझर्व अंपायर असे चार अंपायर एक मॅच कव्हर करत असतात. पूर्ण खेळ यांच्यावरच अवलंबून असतो. त्यातही दोन ग्राउंड अंपायर सर्वात महत्वपूर्ण. पूर्ण मॅचचे संचालन हेच दोघे करत असतात. जास्तीत जास्त योग्य निर्णय देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. आता कधी कधी ते देखील चुकतात. मात्र, याच अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे एखादा खेळाडू शतकापासून वंचित राहू शकतो, आणि तेही वर्ल्डकपमध्ये नक्कीच दुर्दैवी गोष्ट ठरते. कारण वर्ल्डकपमध्ये खेळणे आणि त्यातही शतक झळकावणे हे त्या खेळाडूने पाहिलेले स्वप्न असते. अशीच घटना घडली 2015 वर्ल्डकपवेळी. नक्की काय होता तो किस्सा, आज आपण या लेखातून जाणून घेऊयात…
तब्बल 23 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये वर्ल्डकप खेळला जात होता. वर्ल्डकपच्या पहिल्याच दिवशी दोन्ही यजमान खेळणार होते. तिकडे न्यूझीलंड श्रीलंकेशी आणि आणि ऑस्ट्रेलिया कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडशी. मेलबर्नच्या ऐतिहासिक एमसीजीवर मॅच सुरू झाली. इंग्लिश कॅप्टन ऑयन मॉर्गनने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यादिवशी एमसीजीवर जमलेल्या 85 हजार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची जबाबदारी उचलली ऍरॉन फिंचने. वॉर्नर लवकर आउट झाल्यानंतर त्याने अतिशय शिस्तबद्ध आणि तितकीच आक्रमक बॅटिंग केली. एक लाजवाब शतक ठोकले. मायकल क्लार्कच्या अनुपस्थितीत कॅप्टन झालेला जॉर्ज बेली कॅप्टन्स इनिंग खेळला. त्यानेही आपल्या नावे फिफ्टी जमा केली. मात्र, खरा खेळ दाखवला तो ग्लेन मॅक्सवेल आणि ब्रॅड हॅडिन यांनी. मॅक्सवेलचे 40 बॉल 66 आणि हॅडिनचे 14 बॉल 31 ऑस्ट्रेलियाला 342 पर्यंत घेऊन गेले.
ऑस्ट्रेलियाने आपण पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकण्यासाठीच आलोय हे पहिल्या इनिंगमध्ये दाखवून दिले. दुसरीकडे इंग्लंडलाही वर्ल्डकपची सुरुवात विजयानेच करायची होती. परंतु ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर मिचेल मार्शचा तो दिवस होता. बॅटिंगमध्ये फक्त 20 रन्सच योगदान दिलेल्या मार्शने अशी काही बॉलिंग केली की, इंग्लंडचे सहा धुरंधर 92 रन्सवर माघारी इंग्लंड इथून जिंकण्याची शक्यता अत्यंत कमी होती. मात्र, लक्ष्याच्या जवळ जाऊन नेट रनरेट सुधारावा यासाठी त्यांच्या आशा केंद्रित झाल्या होत्या जेम्स टेलरवर. टेक्निकली जबरदस्त असलेला टेलर सहाव्या नंबरवर बॅटिंगला आलेला. लहान उंचीचा टेलर इंग्लंडचा डाव कसा विणतो यावर सर्वांची नजर होती.
टेलरने साथीला घेतला ऑलराऊंडर ख्रिस वोक्स. अवघ्या 14 ओव्हरमध्ये 92 रन्सची वेगवान भागीदारी त्या दोघांनी सातव्या विकेटसाठी रचली. टेलरने यादरम्यान आपली फिफ्टी पूर्ण केलेली. वोक्स 37 रन्स करून माघारी विजयी लक्ष आणखी बरेच दूर होते. स्टुअर्ट ब्रॉड आणि स्टीवन फिन यांनी स्कोररला फारसा त्रास दिला नाही. ते शून्य आणि एका रनवर आऊट झाले. इंग्लंडची नववी विकेट पडली 195 वर. बॅटिंगला आला जेम्स अँडरसन. अँडरसनकडून कोणालाही अपेक्षा नव्हत्या. त्यामुळे शक्य तितके रन्स काढून घेण्याचा विचार टेलरने केला. त्याने काही जबरदस्त फोर मारले.
त्यानंतर 41 वी ओव्हर टाकण्यासाठी आला जोस हेजलवूड. टेलर आपल्या शतकाकडे निघालेला. अचूक टप्प्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या हेजलवूडने ओवरच्या पाचव्या बॉलवर टेलरला फसवले. बॉल पॅडवर लागला आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केले. त्या मॅचमध्ये दोन दिग्गज अंपायर अंपायरिंग करत होते. एक होते पाकिस्तानचे अलीमदार आणि दुसरे श्रीलंकेचे कुमार धर्मसेना. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अपीलवर अलीम दार यांनी बोट वर केले. टेलरला आउट दिले गेले. त्यानेही अजिबात वेळ न दवडता डीआरएसची मागणी केली. टीव्ही अंपायर बिली बाऊडेन यांनी थोडा वेळ घेतला आणि टेलरला नॉट आउट दिले.
टेलरला नॉट आऊट देताच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दुसरे अपील केले अँडरसनच्या रन आऊटचे. जेव्हा टेलरला अलीम दार यांनी आऊट दिले तेव्हा नॉन स्ट्राइकवर असलेला जेम्स अँडरसन आपल्या क्रीजच्या बाहेर आला होता. हीच संधी साधत हुशार ग्लेन मॅक्सवेलने त्याला रन आऊट दिलेले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या त्या अपीलवर कुमार धर्मसेना यांनी अँडरसनला आऊट देण्याचा निर्णय घेतला. अशावेळी क्रिकेटचा एक मूलभूत नियम आहे. फलंदाजाला एलबीडब्ल्यू दिले आणि त्याने थर्ड अंपायरकडे मागणी केली असता, पॅडवर बॉल लागल्याच्या घटनेनंतरच्या सर्व घटना बेकायदेशीर असतात. थोडक्यात त्यानंतर बॉल डेड होतो. नेमक्या याच नियमाची आठवण जेम्स टेलरने दोन्ही अंपायर्सना करून दिली. मात्र, दोघांनीही त्या नियमाकडे कानाडोळा केला आणि अँडरसनला आउट देण्याचा निर्णय कायम ठेवला. इंग्लंडचा डाव 231 रन्सवर आटोपला होता. ऑस्ट्रेलियाने विजयाने सुरुवात केली होती. आणि तिकडे जेम्स टेलर आपल्या पहिल्या वर्ल्डकप शतकापासून दोन रन्स दूर असताना नॉट आउट राहिला होता. आयसीसीने स्वतः कबूल केले की, ती अंपायर्सची चूक होती.
James Taylor leading a fightback with Chris Woakes, they've put on a record CWC 7th Wicket English partnership #cwc15 pic.twitter.com/tkz1P3pVA3
— ICC (@ICC) February 14, 2015
पुढे इंग्लंड ग्रुप स्टेजमध्येच बाहेर झाली आणि टेलरचे वर्ल्डकप शतकाचे स्वप्न कायमचे अधूरे राहिले. 2016 मध्ये हृदयाच्या आजारामुळे त्याने वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा केला. तो इंग्लिश क्रिकेट बोर्डात सिलेक्टर म्हणून काम करतो, पण त्या हुकलेल्या शतकाची खंत त्याला आजही वाटते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विंडीजच्या दिग्गजाने मनाचा मोठेपणा दाखवताच हुकलेली सेमीफायनल, पाकिस्तानी जनरलकडून मिळालं होतं गिफ्ट
क्रिकेटप्रेमींसाठी खास आर्टिकल: ‘ती’ अजरामर मॅच, ज्यात भारत-पाकिस्तानचे क्रिकेटर खेळलेले एकत्र