साधारण २ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली. या स्पर्धेचा अंतिम सामना आता पुढील महिन्यात साऊथँम्पटन येथे होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघाने बलाढ्य संघांना मागे टाकत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे हे दोन संघ आता पहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी एकमेकांसमोर येतील. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे.
या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडचा मध्यक्रमातील आक्रमक फलंदाज डेव्हन कॉनवेने आगामी इंग्लंड दौऱ्या संदर्भात एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कॉनवेला असा विश्वास आहे की, इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये आणि भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळताना न्यूझीलंडमध्ये ड्यूक चेंडूने केलेल्या सरावाचा मोठा फायदा होईल.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका 2 जूनपासून सुरू होणार आहे, तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 ते 22 जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये खेळला जाणार आहे.
कॉनवे न्यूझीलंडच्या 20 सदस्यीय संघातील केवळ तिसरा खेळाडू आहे, ज्याने आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. दरम्यान, कॉनवेला विश्वास आहे की इंग्लंड दौर्यापूर्वी लिंकनमधील सराव शिबिराचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, न्यूझीलंड संघाला वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल असणाऱ्या इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर खेळण्याचा जास्त अनुभव आहे.
कॉनवे एका ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला की, “हे आमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे, की आम्ही ड्यूक चेंडूने सराव केला आहे. आम्हाला ड्यूक चेंडूने खेळण्याची संधी मिळाली हे विशेष आहे. यामुळे आम्हाला आमची रणनीती तयार करण्यात मदत झाली. पण मला वाटते की चेंडू बदलल्याने फार काही बदल होत नाही. पण हे सर्वांना माहित आहे की, ड्यूक चेंडू कुकाबुरापेक्षा थोडा जास्त स्विंग होतो.”
दरम्यान, कॉनवेच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरीचा विचार केला असता ,त्याने न्युझीलंडकडून 14 टी 20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. टी 20 सामन्यात त्याने 59.12 च्या अविश्वसनीय सरासरीने 473 धावा केलेल्या आहेत. यादरम्यान त्याने 4 अर्धशतके देखील झळकावली आहेत. टी20 मध्ये नाबाद 99 ही कॉनवेची सर्वोत्तम धावसंख्या आहे. दरम्यान ,हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की कॉनवेला आगामी काळात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळते अथवा नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
कोहलीची प्रशंसा करणार्या पोस्टवर डेव्हिड वॉर्नरने दिला ‘हा’ भन्नाट रिप्लाय
जागतिक कुस्ती दिनीच भारताच्या अव्वल कुस्तीपटूला अटक, सहा राज्यांमध्ये होता फरार