सध्या यूएसएमध्ये मेजर लीग क्रिकेट 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पाचवा सामना रविवारी (16 जुलै) डलास येथे पार पडला. या सामन्यात टेक्सास सुपर किंग्स व वॉशिंग्टन फ्रीडम हे संघ आमने-सामने होते. या सामन्यात वॉशिंग्टन संघाने 6 धावांनी विजय मिळवला. टेक्सास संघ पराभूत झाला असला तरी या संघाचा अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो याने सर्वांचे मन जिंकणारी फलंदाजी केली.
या सामन्यात वॉशिंग्टन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वॉशिंग्टन संघासाठी सलामी वीर मॅथ्यू शॉर्ट याने आक्रमक फलंदाजी करताना 50 चेंडूवर 10 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 80 धावा बनवल्या. त्याच्याच फलंदाजीच्या जोरावर वॉशिंग्टन संघाने 163 धावा उभ्या केल्या.
या धावांचा पाठलाग करताना अवघ्या 50 धावांवर टेक्सासचा अर्धा संघ माघारी परतला होता. त्यावेळी मैदानावर उतरलेल्या ब्राव्हो याने खेळाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने वयाच्या 39 व्या वर्षी देखील अगदी युवा खेळाडूंना लाजवेल अशी फटकेबाजी करताना 39 चेंडूंवर 76 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये पाच चौकार व सहा षटकारांचा समावेश होता. टेक्सास संघाला अंतिम षटकामध्ये 27 धावांची आवश्यकता होती. ब्राव्होने पहिल्या तीन चेंडूंवर दहा धावा काढल्या. चौथा चेंडू निर्धाव गेल्यामुळे त्यांची विजयाची संधी हुकली होती. असे असताना देखील त्याने अखेरच्या दोन चेंडूवर सलग चौकार व षटकार मारत पराभवाचे अंतर कमी केले.
ब्राव्हो याने दोन वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे .त्यानंतर यावर्षी त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेत चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाजी प्रशिक्षक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, तो इतर लीगमध्ये अजूनही खेळत आहे.
(Dwayne Bravo Exceptional Hitting In MLC For Texas Super Kings)
महत्वाच्या बातम्या-
विंडीज दौऱ्यानंतर द्रविड अँड कंपनीला मिळणार ब्रेक, प्रशिक्षकपदाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर?
‘मी पुढील 10-12 वर्षे कार्लोसचं…’, 20व्या वर्षी विम्बल्डनचा किताब जिंकणाऱ्या अल्कारेझचा फॅन बनला सचिन