गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी वास्को येथील टिळक मैदानावर एससी ईस्ट बंगाल आणि केरला ब्लास्टर्स यांच्यात लढत होईल. गेल्या तीन सामन्यांतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ईस्ट बंगालचे पारडे जड असेल.
याआधी उभय संघ डिसेंबर महिन्यात आमनेसामने आले होते. त्यावेळी ईस्ट बंगालला 1-1 अशी बरोबरी पत्करावी लागली होती. ब्लास्टर्सने भरपाई वेळेत गोल केला होता. तेव्हापासून ईस्ट बंगालच्या कामगिरीचे चित्र पालटले आहे. रॉबी फाऊलर यांच्या संघाने कामगिरी उंचावत नेली आहे. गेल्या पाच सामन्यांत हा संघ अपराजित आहे. त्यांनी दोन विजय मिळविले आहेत. 11 संघांमध्ये नववा क्रमांक असला तरी बाद फेरीतील स्थानापासून ते पाच गुणांनी मागे आहेत.
संघाचा सध्याचा फॉर्म फाऊलर यांच्यासाठी आनंददादयक ठरला आहे, पण बाद फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी आणखी बरीच झुंज देऊन मजल मारावी लागेल याची फाऊलर यांना कल्पना आहे.
फाऊलर यांनी सांगितले की, अर्थातच आम्ही उत्साहाच्या भरात वाहवत गेलेलो नाही. आमची छोट्या टप्प्यातील कामगिरी उंचावत आहे. जेव्हा लोक आमच्यावर टीका करण्याची घाई करीत होते तेव्हा सुद्धा आम्ही प्रमाणाबाहेर निराश झाला नव्हतो. आम्ही कसून सराव मोठ्या प्रमाणावर करीत राहू आणि आम्ही तशी खुणगाठ मनाशी बांधली आहे. आमच्या संघाचा आत्मविश्वास बराच उंचावल्याचे दिसते आहे आणि संघ स्थिरावला सुद्धा आहे. आम्ही चांगल्या स्थितीत असलो तरी आम्हाला आगेकूच करावी लागेल आणि सध्या जे करतो आहे ते कायम ठेवावे लागेल. स्पर्धेच्या प्रारंभी आम्हाला असलेल्या अपेक्षेच्या तुलनेत जास्त प्रगती साध्य झाली आहे.
या अपराजित मालिकेदरम्यान आघाडी फळीची कामगिरी ही ईस्ट बंगालसाठी एक मोठी सकारात्मक बाब ठरली आहे. कोलकत्याच्या हा बलाढ्य संघ गोलच्या संधी निर्माण करतो आहे आणि गोल करण्याचे मार्ग शोधून काढतो आहे. मोसमाच्या प्रारंभी याच क्षेत्रात त्यांना झगडावे लागले होते.
ब्राईट एनोबाखरे या तरुण खेळाडूचा समावेश केल्यानंतर त्यांची आघाडी फळी भक्कम झाली आहे. नायजेरियाच्या या खेळाडूने तीन सामन्यांत दोन गोल केले आहेत. मध्य फळीनेही पुढाकार घेतला असून मोसमातील दहा पैकी सात गोलांचे योगदान दिले आहे. इतर कोणत्याही संघाच्या मध्य फळीपेक्षा ही कामगिरी सरस आहे.
मोसमात सर्वाधिक 19 गोल पत्करलेल्या आणि एकच क्लीन शीट राखू शकलेल्या ब्लास्टर्सविरुद्ध ही बाब भक्कम ठरेल. दुसरीकडे ईस्ट बंगालप्रमाणेच ब्लास्टर्सची आघाडी फळी सुद्धा फॉर्मात आली आहे. त्यांनी 13 गोल केले असून यापेक्षा जास्त संख्या केवळ मुंबई सिटी एफसी आणि हैदराबाद एफसी यांची आहे. किबु व्हिकुना यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ब्लास्टर्सकरीता आठ वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल केले आहेत, जे संयुक्तरित्या अव्वल प्रमाण आहे. ब्लास्टर्सचा संघ जोपर्यंत गोल करतो आहे तोपर्यंत त्यांच्या आघाडी फळीतील समस्या व्हिकुना यांना त्रस्त करणार नाहीत.
व्हिकुना यांनी सांगितले की, गोल पत्करणे ही नव्हे तर प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त गोल करणे ही सर्वांत महत्त्वाची बाब असते. तुम्ही पत्करले त्यापेक्षा जास्त गोल केले तर मनोधैर्य आपोआप उंचावते. आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. या घडीला महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही सामन्यांत आम्ही गोलच्या संधी निर्माण करतो आहोत. आम्हाला संतुलनाच्या जोरावर यात सातत्य राखावे लागेल. आम्हाला प्रतिस्पर्ध्याच्या संधी कमी कराव्या लागतील आणि ते गोल करणार नाहीत म्हणून दक्ष राहावे लागेल.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०: जमशेदपूरविरुद्ध गोव्याचा महत्त्वाचा विजय
आयएसएल २०२०-२१ : ओदिशाला हरवून चेन्नईयीनची आगेकूच
आयएसएल २०२०-२१ : ओगबेचेच्या गोलमुळे मुंबई सिटीचा एटीके मोहन बागानला शह