जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळातील सर्वाधिक लोकप्रिय सामना समजल्या जाणाऱ्या एल क्लासीकोला अवघे काही तास उरले आहेत.
रियल मॅड्रिड विरुद्ध बार्सिलोना असा सामना उद्या भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५.३० वाजता थेट प्रक्षेपित होणार आहे.
रियल मॅड्रिडचे घरचे मैदान सॅंटिगो बर्नबोवर खेळवला जाणार आहे. मागील दोन्ही ला लीगाच्या सामन्यात रियल मॅड्रिडला घरच्या मैदानावर पराभवाचे तोंड पहावे लागले होते.
एल क्लासिको सारखा सामना जिंकायचा म्हणजे दोन्ही संघांना प्रत्येक विभागात सर्वोत्तम खेळ करावा लागतो आणि त्याची जबाबदारी असेल ती प्रत्येक विभागातील प्रमुख खेळाडूंकडे. दोन्ही संघांचे प्रत्येक विभागातील प्रमुख खेळाडू आणि त्यांच्यातील स्पर्धेवर एक आलेख खालीलप्रमाणे:-
गोलकीपर
(टेर स्टेगन विरुद्ध नावास)
जर्मनी आणि बार्सिलोनाचा गोलकीपर टेर स्टेगन मागील वर्षी काही विशेष असा ठसा उमटवण्यात जरी अपयशी ठरला असेल तरी या वर्षी तो उत्तम लयीत आहे.
चॅम्पियन्स लीग मध्ये सर्वात कमी गोल बार्सिलोना विरुद्ध होण्यामागे सर्वात मोठा हात टेर स्टेगनचा होता तर ला लीगा मध्ये सर्वाधिक म्हणजे ९ सामन्यात समोरच्या संघाला गोलचे खाते उघडु दिले नाही.
तर त्याच्या समोर असेल रियलचा नावास. या वर्षी विशेष असे काही करण्यात जरी अपयश आले असले तरी काही अप्रतिम गोल सुद्धा वाचवले आहेत. भक्कम बचावफळी मुळे नावासवर कमी दबाव असेल तर उमतीतीच्या अनुपस्थितीत टेर स्टेगनवर जास्त दबाव असेल.
डिफेंडर्स
(रामोस विरुद्ध पिके)
आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध स्पेन आणि रियलचा कर्णधार रामोस रियल मॅड्रिडचा डिफेंस तर उमतीतीच्या अनुपस्थितीत बार्सिलोनाचा डिफेंस पिकेवर अवलंबुन असेल.
शेवटच्या काही मिनिटमध्ये गोल करण्यास प्रसिद्ध रामोस फ्री किक आणि काॅर्नरला जास्त धोकादायक ठरतो. त्याने रियल तर्फे ५२९ सामन्यात ६८ गोल्स केले आहेत तर पिकेने बार्सातर्फ् ४११ सामन्यात ३६ गोल्स केले आहेत.
मिडफिल्डर
(माॅड्रिक विरुद्ध इनिएस्टा)
मिडफिल्डवर निर्विवाद वर्चस्व गाजवणारे हे २ खेळाडू उद्याच्या सामन्यात आपल्या संघासाठी संधी निर्माण करायचे काम करतील. मागील वर्षीची माॅड्रिकची कामगिरी हे सुद्धा रियलच्या यशामागचे एक प्रमुख कारण होते.
त्यामुळेच माॅड्रिकला बॅलन डी ओरच्या यादीत ५ वे स्थान दिले होते तर दुसरीकडे मागील वर्षी इनिएस्टा संपला असे बोलणार्यांना चोख उत्तर देत यावर्षी इनिएस्टा अफलातुन खेळ करत आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंमधील स्पर्धा पाहण्यासारखी असेल.
फाॅर्वड
(रोनाल्डो विरुद्ध मेस्सी)
एल क्लासिकोचे विशेष आकर्षण हेच २ खेळाडू आहेत असे बोलण्यास काही हरकत नाही. तब्बल १० वर्ष बॅलन डी ओरवर दोन्ही खेळाडूंनी मिळून निर्विवाद वर्चस्व गाजवले. मागील वर्षीचा बॅलन डी ओर विजेता रोनाल्डो आणि क्लासिकोचा सर्वाधिक २४ गोल्सचा विक्रम नावी असलेला मेस्सी यांच्यात कोण गोल करेल हे पाहण्यासारखे असेल.
मेस्सीने रियलच्या घरच्या मैदानावर १४ गोल्स केले आहेत पण रोनाल्डो कधीपण पुनरागमन करत गोल करु शकतो त्यामुळे यांच्यातील सामना पाहण्यास सर्व उत्सुक आहेत.
दोघांचे या वर्षी ५३ गोल्स आहेत आणि हा वर्षातला शेवटचा सामना. त्यामुळे गोल करणारा सर्वाधिक गोल्सचा विक्रम पण आपल्या नावे करेल. तर टोट्टेन्हम स्पर्सचा केन ५० गोल्स करत ४ नंबरला आहे आणि तो २ सामने खेळणार आहे.