इंग्लंड दौऱ्यातील भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघासाठी आज (११ जुलै) महत्त्वाचा दिवस आहे. आज इंग्लंड आणि भारत यांच्यात टी २० मालिकेतील शेवटचा सामना खेळला जाणार आहे. साऊथम्प्टन येथे खेळला जाणारा हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे.
या मालिकेतील तीन सामने गमावल्याने भारताचे क्रमवारीतील अव्वल स्थान धोक्यात आले आहे. त्यामुळे आता मालिकेचा शेवट तरी विजयाने करण्याचा पाहुण्या संघाचा प्रयत्न असणार आहे. दुसरीकडे इंग्लंडचा अनुभवी विकेटकीपर-फलंदाज जोस बटलर याला दोन मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी २० सामने
बटलर पाचव्या सामन्यात खेळला तर तो रोहित शर्मा आणि जॉर्ज डॉकरेल (आयर्लंड) यांना मागे टाकून टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा दुसरा खेळाडू बनेल. सध्या तिघांनी प्रत्येकी १५९ सामने खेळले आहेत. या यादीत आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग १६३ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळून पहिल्या स्थानावर आहे.
सर्वाधिक टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे-
पॉल स्टर्लिंग (आयर्लंड) – १६३
जोस बटलर (इंग्लंड) – १५९
रोहित शर्मा (भारत) – १५९
जॉर्ज डॉकरेल (आयर्लंड) – १५९
मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) – १५२
तसेच बटलरने पाचव्या सामन्यात एक षटकार मारला, तर तो एमएस धोनीला मागे टाकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अव्वल विकेटकीपर-फलंदाज बनेल. (ENG vs IND 5th T20 Jos Buttler has chance to surpass ms Dhoni also Rohit Sharma’s major record also at risk.)
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या विकेटकीपर-फलंदाजांच्या यादीत बटलर धोनीसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. दोघांनी प्रत्येकी ३५९ षटकार मारले आहेत. जर पाचव्या सामन्यामध्ये बटलरने षटकार मारला तर तो धोनीला मागे टाकून पहिले स्थान पटकावेल.
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे विकेटकीपर-फलंदाज
जोस बटलर (इंग्लंड) – ३५९
एमएस धोनी (भारत) – ३५९
क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) – ३००
ऍडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) – २५९
ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) – २०८
इंग्लंड पुन्हा एकदा अव्वल क्रमांक गाठण्याच्या तयारीत
भारताने मागील चार वर्षांपासून आयसीसी टी २० क्रमवारीत अव्वल स्थानावर आपले वर्चस्व राखले आहे. आता भारताचे ते स्थान धोक्यात आले आहे. इंग्लंडने पाचवा सामना जिंकला तर ते पुन्हा अव्वल स्थानावर येतील. सध्या भारत २६९ पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर, तर इंग्लंड २६७ पॉइंट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.






