भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील चौथा सामना भारताने १५७ धावांनी जिंकला असून भारतीय संघाने २-१ अशी आघाडी घेतली. भारताने या कसोटी मालिकेतील दुसरा आणि चौथा सामना जिंंकला आहे. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात एका डावाच्या मोठ्या फरकाने भारताला हरवले होते. मालिकेतील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला होता. आता मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना १० सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे. पाचव्या कसोटीत इंग्लंड संघ सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय संघाने चौथ्या कसोटीत आप्रतिम प्रदर्शन करून सामना जिंकला असला तरीही पाचव्या कसोटी सामन्यासठी संघात काही बदल करणे आवश्यक आहे, ज्यामुळे संघाला फायदा होऊ शकतो. त्याच बदलांचा आम्ही येथे आढावा घेतला आहे.
अजिंक्य रहाणेच्या जागी हनुमा विहारी
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मागच्या काही काळापासून त्याच्या खराब फार्मशी झगडत आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याचे प्रदर्शन खूप खराब राहिले आहे. तो या मालिकेत धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसला आहे. मालिकेतील आतापर्यंत खेळल्या गेलेल्या चार सामन्यांमधीत सात डावांत त्याने केवळ १५.५७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने सर्वाधिक ६१ धावा केल्या होत्या.
लीड्स आणि द ओव्हल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यांध्येही तो चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याच्या या सततच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला पाचव्या कसोटी सामन्यात संघातून बाहेर करत हनुमा विहारीला संघात स्थान दिले गेले पाहिजे. हनुमा विहारीने भारतीय संघासाठी अनेकदा महत्वाची खेळी केली आहे. तो यापूर्वी इंग्लंमध्ये खेळलेला आहे. त्यामुळे तो इंग्लंडमध्ये चांगले प्रदर्शन करू शकतो. त्याव्यतिरिक्त विहारी ऑफ स्पिन गोलंदाजीही करू शकतो आणि संघासाठी गरजेच्या वेळेला गोलंदाजी करून विकेट्सही मिळवू शकतो.
मोहम्मद सिराजच्या जागी मोहम्मद शमी
मालिकेतील चौथ्या कसोटीमध्ये भारतीय संघाने मोहम्मद शमीला विश्रांती दिली आहे. संघाने त्याच्या जागी उमेश यादवला संधी दिली होती आणि त्याने चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघ चौथ्या कसोटी सामन्यात विजयी झाला. असे असले तरीही तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजही काही चांगले प्रदर्शन करू शकला नाही आणि त्याने जास्त विकेट्सही घेतल्या नाहीत.
यामुळेच भारतीय संघाने पाचव्या कसोटी सामन्यामध्ये सिराजच्या जागी अनुभवी मोहम्मद शमीलाच संघात सामील केले पाहिजे. त्याचा अनुभव भारतीय संघासाठी मदतीचा ठरू शकतो. मोहम्मद शमी पाचवा सामना जिंकण्यासाठी महत्वाचा गोलंदाज ठरू शकतो. भारतीय संघ पाचव्या सामन्यात जिंकला तर १४ वर्षानंतर इंग्लंडला त्यांच्या मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा इतिहास घडेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘गोल्डन बॉय’चा भाव वाढला! ब्रँड व्हॅल्यूमध्ये नीरजने रोहित-राहुलला सोडले मागे, आता कोहलीवर नजर
चौथ्या कसोटीतील इंग्लंडच्या दारुण पराभवानंतर संतापला माजी क्रिकेटर; म्हणाला, ‘लाज वाटते…’
कॅप्टन कोहली पुन्हा तोडणार लाखो चाहत्यांची मने? अश्विनच्या पाचव्या कसोटीतील स्थानाविषयी दिले संकेत