इंग्लंड आणि भारत यांच्यात द ओव्हल मैदानावर चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडने भारतीय संघावर ९९ धावांची आघाडी मिळवली होती. मात्र, आता भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सामन्यात चांगली पकड बनवली आहे. भारतीय संघाने २७० धावांवर ३ विकेट गमावल्या असून सामन्यात इंग्लंडवर १७१ धावांची आघाडी घेतली आहे.
संघाच्या सामन्यातील पुनरागमनाचे श्रेय सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांना जाते. रोहितने विदेशात कसोटीमधील त्याचे पहिले शतक केले आहे. त्याने १२७ धावांची खेळी केली. तसेच पुजाराने मालिकेतील सलाग दुसऱ्या कसोटीत अर्धशतक केले आहे. त्याने या डावात ६१ धावा केल्या. असे असले तरी पुजारा त्याच्या या खेळीने संतुष्ट झालेला नाही आणि त्याने पाचव्या कसोटीमध्ये शतक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
चेतेश्वर सामन्याच्या तिसऱ्या दिवसानंतर स्काई स्पोर्ट्सशी बोलताना व्यक्त झाला आहे. फलंदाजी करताना त्याचा पाय मुरगळला होता. त्याला पहिल्यांदा त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “माझा पाय आता दुखत आहे, पण ठीक आहे. पाय थोडा सुजलेला आहे. मात्र, पायाची नक्की काय स्थिती आहे, हे उद्याच कळेल.”
सामन्यातील भारताच्या पुनरागमनाचे श्रेय त्याने सलामीवीरांना दिले आहे. सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि केएल राहूल यांनी ८३ धावांची भागीदारी केले होती. तो त्यांच्याविषयी म्हणाला, “सलामीवीरांनी भक्कम सुरुवात करून दिली आणि त्यांच्या फलंदाजीमुळे येणाऱ्या फलंदाजांना चांगले प्रदर्शन करण्यासाठी आत्मविश्वास मिळाला. जेव्हा मी फलंदाजीसाठी आलो तेव्हा चेंडू जास्त हालचाल करत नव्हता. लंच आणि टी ब्रेक सेशनमध्ये आमची भागीदारी चांगली राहिली.”
पुजाराने बोलताना रोहित शर्माच्या फलंदाजीचेही खूप कौतुक केले. तो म्हणाला, “रोहित शर्मा संपूर्ण मालिकेतच फॉर्ममध्ये दिसला आहे. त्याने दोन अर्धशतकही केले आहेत. आम्ही त्याच्या मोठ्या डावाची वाट पाहत होतो आणि ओव्हल कसोटीमध्ये त्याने हे करून दाखवले. नाॅन स्ट्राईकवर उभा राहून त्यांची फलंदाजी पाहताना मजा आली. त्यांच्या फलंदाजीमुळे भारत आता चांगल्या स्थितीत आहे.”
पुजारा त्याच्या फलंदाजीविषयी म्हणाला, “माझी लय परत येत आहे. माझा फुटवर्क आता बरोबर चालत आहे. मी फलंदाजीवर जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहे. धावा करून चांगले वाटत आहे. मात्र, मला शतकाची अपेक्षा आहे. आशा आहे की, पुढच्या कसोटी सामन्यात मोठी खेळी करू शकेल.”
ओव्हलवरील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रेग ओव्हर्टनने पुजाराला स्लेजिंगचा प्रयत्न केला. पुजाराने त्याच्या एकाच षटकात दोन चौकार मारले आणि त्यानंतर क्रेग चिडला होता. षटकाचा चौथा चेंडू पुजाराने डिफेंस केला आणि तो चेंडू क्रेगच्या हातात गेला. त्यानंतर क्रेगने तो चेंडू पुजाराला मारल्यासारखे केले मात्र हातातून चेंडू सोडला नाही. त्याने हे कृत्य पुजाराचे लक्ष विचलीत करण्यासाठी केले होते. असे असले तरी पुजाराला या गोष्टीने काहीच फरक पडलेला दिसला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
जार्वोसारख्या मैदानात घुसणाऱ्या दर्शकाला जेव्हा क्रिकेटरने बॅटने दिला चोप, कसाबसा सुटला तावडीतून
‘कसोटी संघातील स्थान टिकवून ठेवण्याची हीच शेवटची संधी होती’, शतकवीर रोहितचे गंभीर विधान
रोहित, राहुलच्या ‘त्या’ फटक्याने वेधले सर्वांचे लक्ष, पाहून तुम्हालाही आठवेल मास्टर ब्लास्टर