इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन केले. सिराजच्या गोलंदाजीच्या मदतीने भारतीय संघाने सामन्यात विजय मिळवला. सामन्याच्या दोन्ही डावांत सिराजने ४-४ विकेट घेतल्या. भारतीय संघाने या सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर जगभरात त्याचे कौतुक केले जात आहे. सिराजने केवळ ७ कसोटी सामन्यांत त्याच्या खेळाचा दर्ज दाखवून दिला आहे. त्याच्या या कामगिरीचे कौतुक पाकिस्तानातही होत आहे. पाकिस्तानची क्रिडा पत्रकार झेनाब अब्बास हीने सिराजचे कौतुक केले आहे.
पाकिस्तानच्या माजी खेळाडूंपासून ते पत्रकारही मोहम्मद सिराजच्या खेळीचे कौतुक करत आहेत. पाकिस्तानची सुप्रसिद्ध क्रिडा पत्रकार झेनाब अब्बास तर त्याची फॅनच झाली आहे. तिने एका व्हिडिओत सिराजला विश्वस्तरीय गोलंदाज म्हटले आहे.
झेनाब म्हणाली, “मोहम्मद सिराज विश्वस्तरीय गोलंदाज बनत चालला आहे. ज्याप्रकारे त्याने ऑस्ट्रेलियात विकेट मिळवल्या आणि आता लाॅर्ड्सवरही त्याने गडी बाद केले आहेत. सिराजकडे वेग आहे, त्याच्याकडे चेंडूला नियंत्रणात ठेवण्याचे कौशल्यही आहे. तो चेंडूला बाहेरच्या दिशेने घेऊन जातो आणि त्याची लाइन-लेंथ कमालीची आहे.”
तिने म्हटले की भारताकडे १०-१५ वर्षांपूर्वी असे वेगवान गोलंदाज नव्हते. आता भारत वेगवान गोलंदाजांमुळे वेगळा संघ बनला आहे. ती पुढे बोलताना म्हणाली, “बुमराहचे जेवढे कौतुक करावी तेवढे कमीच आहे. इशांत शर्माने चांगली गोलंदाजी केली. मोहम्मद शमीला विसरायला नको. शमीने तर अप्रतिम फलंदाजीही केली. त्याच्या बुमराहसोबतच्या भागीदारीने सामनाच पालटला. आजच्या क्रिकेटमध्ये त्यांच्यासारखे शेवटचे फलंदाज नाहीत. तुम्ही एक चांगला गोलंदाज तर असायलाच हवे पण तुम्हाला फलंदाजीही यायला पाहिजे. ही कसोटी क्रिकेटची गरज आहे. फलंदाजीसाठी खेळपट्टी चांगली झाली आहे. तुम्ही ९० च्या शतकासारखे खेळू नाही शकत. तरीही चांगले क्रिकेट कोणीही खेळूद्या तुम्ही त्याचे कौतुक केले पाहिजे”
झेनाब अब्बासने भारतीय संघाच्या मानसिकतेचेही कौतुक केले. तिने म्हटले, “भारतीय संघामध्ये लढण्याचा जज्बा आहे. हा संघ कधीच हार मानत नाही. हा विश्वास तुम्हाला सामना जिंकून देतो. इंग्लंडच्या प्रदर्शनाविषयी बोलायचे तर ते खुपच निराशाजनक राहिले. त्यांनी त्यांच्या हातातला सामना भारताला दिला.”






